राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला जोरदार सुरुवात pudhari photo
रायगड

Raigad News : राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला जोरदार सुरुवात

खाडीपट्टयातील रावढळ पुलासह मोर्‍या आणि अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे काम होणार सुसाट

पुढारी वृत्तसेवा

खाडीपट्टा : रघुनाथ भागवत

महाड खाडीपट्टयातील मुख्य रस्ता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव असलेले आंबडवे ते राजेवाडी फाटा या दरम्यानच्या दोन पदरी रस्त्याचे काम पावसाळी हंगामात थांबलेले आता मात्र कामाला जोरदार सुरवात झाली असून रावढळ पुलासह खाडीपट्टयातील म्हाप्रळ ते शिरगाव फाटयापर्यंतच्या राहिलेल्या मोर्‍यांदरम्यानचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे काम करणार्‍या एजन्सीकडून सांगण्यात आले आहे.

गोमेंडी, वराठी दरम्यानच्या काँक्रीटीकरण कामाला नुकतीच सुरवात करण्यात आली असून येत्या पाच-सहा दिवसांत रावढळ पुलाच्या कामाला देखील सुरवात करण्यात येईल असे ठेकेदारांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. खाडीपट्टयातील म्हाप्रळ ते शिरगाव फाटया दरम्यान जवळ-जवळ ऐंशी ते नव्वद टक्के काम पूर्णत्वाला गेल्याचे पाहायला मिळत असून मोर्‍या आणि या मार्गावरील मुख्य रावढळ पुल तसेच तेलंगे, चोचिंदे ते शिरगाव फाटया दरम्यानचा रस्ता तसेच काही ठिकाणी एकेरी काम राहिले आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना थेट जन्मगाव असलेल्या आंबडवे येथे मुंबई-गोवा हायवेने जाता यावे म्हणून सावित्री पूल उद्घाटनाच्या वेळेस 2017 साली राष्ट्रीय महामार्गासह दोन पदरी रस्त्यामध्ये रूपांतरित करीत राजेवाडी फाटा ते आंबडवे या रस्त्याचे भूमिपूजन तत्कालीन तथा विद्यमान मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केले होते.

त्यानंतर प्रत्यक्षात उशिराने रुंदीकरणाचे काम सुरु झाले. मात्र रुंदीकरण कामाच्या वेळी झालेली रस्त्याची दुरवस्था त्यामुळे गेली चार-पाच वर्षे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे. आता रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून पावसाळी हंगाम संपल्यावर आता चार दिवसांपूर्वी हाती घेण्यात आलेल्या रस्त्याच्या कामामुळे खाडीपट्टावासियांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, रावढळ पुलाच्या कामामुळे दरवर्षी भेडसवणारी पुराची आणि त्यामुळे पुलापलिकडील तीस ते पसतीस गावांचा तुटणारा संपर्क ही समस्या कायमची निघुन जाईल अशी आशा येथील स्थानिकांना वाटत आहे. रावढळ ते तुडील फाटा दरम्यानच्या रस्त्याचे काम रावढळ पुलामुळे राहिले आहे, ते देखील काम येत्या पाच-सहा दिवसांत सुरु होणार असल्याने रावढळ पुलाची उंची वाढून संभाव्य पुराचा धोका टळणार असल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

बांधकाम पारदर्शी करण्याची मागणी

पावसाळी हंगामानंतर खाडीपट्टयातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला नुकतीच जोरदार सुरवात झाल्याने प्रथम वराठी ते गोमेंडी दरम्यानच्या काँक्रीटीकरणाला सुरुवात झाली आहे. या टप्यातलत सुरु झालेल्या काँक्रीटीकरण कामांसह डांबरीकरण कामाला वेग मिळो आणि मोर्‍यांसह, गटार लाईनची कामे तसेच खाडीपट्टयातील मुख्य रावढळ पुलाचे काम देखील पारदर्शक मार्गी लागो अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT