National Airlines Boeing 747F
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई मालवाहतूक सेवेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. नॅशनल एअरलाइन्सचे बोईंग ७४७ एफ मालवाहू विमान जर्मनीतील फ्रँकफर्ट-हॅन या प्रमुख युरोपीय कार्गो केंद्रातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. या विमानाच्या आगमनामुळे नवी मुंबई विमानतळावर प्रथमच बोईंग ७४७ मालवाहू विमान उतरल्याची नोंद झाली आहे.
‘क्वीन ऑफ द स्काइज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिग्गज विमानाचे विमानतळावर जलतोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले. मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करण्याची क्षमता असलेल्या या विमानाच्या आगमनामुळे नवी मुंबई विमानतळाच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेला आणखी चालना मिळणार आहे.
नॅशनल एअरलाइन्सच्या ताफ्यात सध्या नऊ बोईंग ७४७ मालवाहू विमाने आहेत. मोठ्या प्रमाणातील मालाची वाहतूक, मानवतावादी मदत तसेच विशेष प्रकारच्या मालवाहतुकीसाठी या विमानांचा वापर केला जातो.
बोईंग ७४७ एफच्या नवी मुंबई विमानतळावरील आगमनामुळे मुंबई महानगर प्रदेशातील आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहतुकीच्या क्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय कार्गो वाहतुकीसाठी नवी मुंबई विमानतळाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही घटना मानली जात आहे.