Cyber fraud  File Photo.
रायगड

Nagothane Cyber Fraud: OTP दिला अन् मोबाइल गेला सायबर भामट्यांच्या ताब्यात! व्यापाऱ्याच्या १५० मित्र-नातेवाईकांना पैशांची मागणी

‘माझे UPI चालत नाही, अर्जंट ₹५५ हजार पाठवा’ असा मेसेज; एका मित्राने पैसे पाठवल्यानंतर फसवणूक उघड

पुढारी वृत्तसेवा

नागोठणे शहर: नागोठण्यातील व्यापारी मुकेश जैन हे रविवारी पनवेल येथे गेले असताना ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकाराला बळी पडण्याची घटना घडली. एका अनोळखी व्यक्तीने फोन करून तुमचे ऑनलाइन पार्सल आले आहे असे सांगत ओटीपी मागितला. मुकेश जैन यांनी संबंधित व्यक्तीला ओटीपी दिल्यानंतर काही वेळातच त्यांचा मोबाईल हॅक करण्यात आला.

मोबाईलचा ताबा मिळवल्यानंतर संबंधित सायबर भामट्याने मुकेश जैन यांच्या मोबाईल क्रमांकावरून त्यांच्या व्यापारी मित्र, मित्रपरिवार व नातेवाईक अशा जवळपास १५० जणांना संदेश पाठविला.

हा संदेश मुकेश जैन यांनीच पाठविल्याचा भास निर्माण करण्यात आला होता. संदेशामध्ये, 'हॅलो, मुझे एक हेल्प चाहिए, मेरा यूपीआय काम नहीं कर रहा है, अर्जंट ५५ हजार मेरे अकाउंट में डालो, दो घंटे में रिटर्न कर दूंगा,” असे नमूद करण्यात आले होते.

काही मित्रांनी या संदेशाला प्रतिसाद देत पैसे कोणत्या खात्यावर पाठवायचे, अशी विचारणा केली असता ‘गोविंद’ नाव आणि एक मोबाईल क्रमांक पाठविण्यात आला. या फसवणुकीच्या प्रक्रियेत एका व्यापाऱ्याने २ हजार रुपये पाठविल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, काही मित्रांनी मुकेश जैन यांच्या भावाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या संदेशाबाबत विचारणा केली. त्यानंतर त्यांच्या भावाच्या लक्षात काहीतरी गडबड असल्याचे आले. त्यांनी तातडीने मित्रपरिवार व नातेवाईकांना याबाबत माहिती देत कोणत्याही प्रकारचे पैसे पाठवू नका, असे आवाहन केले.

त्यामुळे मोठी सतर्कता बाळगल्याने लाखो रुपयांची संभाव्य ऑनलाइन लूट टळली. या घटनेमुळे ओटीपी, यूपीआय आणि मोबाइल हॅकिंगच्या माध्यमातून होणाऱ्या सायबर फसवणुकीचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. सध्या सर्वत्र मोबाईल हॅक करून फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत.

नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन

अनोळखी व्यक्तीने पार्सल, बँक खाते, केवायसी, यूपीआय किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी फोन केल्यास ओटीपी, यूपीआय पिन, एटीएम, डेबिट कार्डची माहिती किंवा अन्य गोपनीय माहिती कधीही देऊ नये.

तसेच आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावरून पैशांची मागणी करणारा संदेश आल्यास पैसे पाठविण्यापूर्वी त्या व्यक्तीशी थेट फोनवरून संपर्क साधून खात्री करावी. ‘ओटीपी सांगितला, तर फसवणुकीचा दरवाजा उघडला’ त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT