अलिबाग: मुरूडमध्ये सक्रिय असणार्या बेकायदा चरस विक्रेत्यांचे रॅकेट रायगड पोलिसांनी उद्ध्वस्त केले असून या रॅकेटमधील एकूण 13 आरोपींना पोलिसांनी आतापयर्र्ंत ताब्यात घतले आहे. त्यांच्याकडून 13 लाख 61 हजार रुपये किमतीचा 2 किलो 659 ग्रॅम चरस हा अमलीपदार्थ जप्त करण्यात आला असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिली.
मुरूडमध्ये 29 जून रोजी नाकाबंदी सुरू असताना शिघे्र पोलीस चेक पोस्ट येथे तपासणी दरम्यान मुरुड शहरातील सिध्दी मोहल्ला येथे राहाणारा 19 वर्षीय आरोपी अलवान निसार दफेदार हा त्याचा सहकारी आरोपी राजू खोपटकर (रा. गावदेवी पाखाडी मुरूड) याच्यासह स्कुटीवरून जात असताना पोलिसांना पाहून मागे बसलेला आरोपी राूज खोपटकर हा तेथून पळून गेला. त्यामुळे चेक पोस्टवरील पोलिसांनी अलवान दफेदारला याला अडवून त्यांची स्कुटी तपासली असता स्कुटीच्या डिकीमध्ये 776 ग्रॅम चरस हा अमलीपदार्थ पोलिसांना आढळला.
पोलिसांनी तातडीने अलवान दफेदार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने चरस विक्री करीत असल्याचे सांगून त्याच्या साथीदारांची नावेही पोलिसांना सांगितली. त्याच्या साथीदारांमध्ये मुख्य डिलर विशाल रामकिशन जैसवाल (वय 27, उत्तर प्रदेश) हा आहे. त्याचप्रमाणे अनुप राजेश जैसवाल (रा. मुरूड गावदेवी पाखाडी), अनुज विनोद जैसवाल (वय 19 रा. मजगांव, ता. मुरूड) यांच्या मदतीने आरोपी आशिष अविनाश डिगे (वय 25 रा. काशिद, ता.मुरूड), प्रणित पांडुरंग शिगवण (वय 25 रा. सर्वे, ता.मुरूड), आनस इम्तियाज कबले (वय 20 रा. पेठ मोहल्ला मुरूड), वेदांत विलास पाटील (वय 18 रा. मजगांव. ता. मुरूड), साहिल दिलदार नाडकर (वय 27 वर्षे, रा. वरचा मोहल्ला, रोहा), अनिल बंडु पाटील (वय 40, रा. मांडा, कल्याण), सुनिल बुधाजी शेलार (34 वर्षे, मु.पो. फलेगांव, ता. कल्याण, जि.ठाणे), राजु खोपटकर (रा. गावदेवी पाखाडी मुरूड), खुबी माखनसिंग भगेल (रा.मुरूड) याच्या मदतीने अवैध धंदा करीत होते. या 13 जणांना अटक करण्यात आली आहे.
मुख्य डिलर आरोपी विशाल जैसवाल हा नेपाळ, उत्तर प्रदेश येथून चरस आणत होता. तर त्याचे साथीदार अनुप जैसवाल व अनुज जैसवाल यांच्यामार्फत आशिष डिगे व प्रणित शिगवण इतर आरोपींच्या मदतीने विकत होते.
या गुन्हयाचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, सपोनि विजयकुमार देशमुख, पोसई अविनाश पाटील, हवालदार जनार्दन गदमले, हवालदार हरी मेंगाल, पोलिस नाईक किशोर बठारे, शिपाई अतुल बारवे यांनी केला आहे. अमली पदार्थाच्या बाबतीत शून्य सहनशीलता (झिरो टॉलर्नस) रायगड पोलिस दलातील अधिकार्या यांना लागू करण्यात आली आहे. ज्यांच्या अधिकारक्षेत्रात हा गुन्हा घडला आहे त्या अधिकार्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील महाविद्यालय, शाळेत जावून अंमली पदार्थ विरोधात विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. तसेच रायगड जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधात कारवाया या मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आहेत. अमली पदार्थाविरोधात काही संशयास्पद माहीती प्राप्त झाल्यास थेट पोलिसांसोबत संपर्क करा.आँचल दलाल, जिल्हा पोलिस अधिक्षक