खोपोली शहर : रायगड जिल्ह्यासह खालापूर तालुका आणि खोपोलीला मुसळधार पावसाने झोडपले असून दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस सगळीकडे पडत आहे. त्यातच लोणावळा-खंडाळासह घाटमाथ्यावर सुद्धा जोरदार पाऊस पडत आहे.
तर या सततच्या पावसाचा परिणाम मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतुकीवर दिसून येत आहे. मुसळधार पावसामुळे घाटमाथ्यावर दृश्यमानता कमी झाल्याने मुंबई आणि पुणे या दोन्ही दिशेने जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावला आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने अवजड व हलकी वाहने वाहनचालक सावधगिरीने चालवत असल्याने एक्स्प्रेस वे वर वाहनांची हालचाल संथ गतीने सुरू आहे. घाट परिसरात पावसाचा जोर कायम असून हा परिसर धुक्याने व्यापले आहे.
वेगावर नियंत्रण ठेवा
बोरघाट महामार्ग प्रशासनाने वाहनचालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याचे, सुरक्षित अंतर राखण्याचे आणि पावसाळ्यात आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाने पुढील काही तास घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून प्रवाशांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.