रोहे, पुढारी वृत्तसेवा : नाताळ आणि हिवाळी सुट्यांमुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने (Central Railway) मुंबई - करमळी (Mumbai to Karamali Trains) दरम्यान अतिरिक्त १८ हिवाळी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, रोहा, माणगाव स्थानकात थांबा दिला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रवाशांना लाभ मिळणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस - करमाळी - लोकमान्य टिळक टर्मिनस दैंनदिन विशेष - १८ सेवा पुरविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 01149 विशेष दि.२३ डिसेंबर ते दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दररोज १५.३० वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी ०५.३० वाजता पोहोचेल. (९ सेवा), गाडी क्रमांक 01150 विशेष दि. २४ डिसेंबर २०२४ ते दि. ०१ जानेवारी २०२५ पर्यंत करमळी येथून दररोज ०६.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी २२.१५ वाजता पोहोचेल. (९ सेवा) या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी हे थांबे देण्यात आले आहेत. या गाडीला डबे एक प्रथमसह- द्वितीय वातानुकूलित, तीन द्वितीय वातानुकूलित, १२ तृतीय वातानुकूलित, २ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी/चेअर कार, १ लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन असे ठेवण्यात आले आहेत.
या गाडीचे आरक्षण विशेष ट्रेन क्र.01149/01150 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेस्थळावर सुरू होईल. या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या. किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा, असे आवाहन मध्य रेल्वे कडून करण्यात आले आहे.