मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीत मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. येथे संरक्षण भिंत बांधण्याची गरज निर्माण झाली आहे.
दोन्ही बाजूंच्या रस्त्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे परंतु रस्त्याच्या बाजूला गटार बांधण्यात आले नसल्यामुळे मुसळधार पावसामुळे डोंगरमाथ्यावरील दगड, माती, सरळ रस्त्यावर येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड हे निर्जन ठिकाण आहे. या ठिकाणी महामार्गाच्या कामासाठी दोन्ही बाजूचे डोंगर खोदून ठेवले आहेत. यामुळे डोंगराची माती सैल झाली आहे. यामुळे डोंगर माथ्यावरील दगड धोंडे तसेच माती खाली येण्याचा धोका वाढला आहे. येथे दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे प्रवाशांचा नाहक बळी जाऊ शकतो. याची खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात यावी अशी प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड हे निर्जन ठिकाण आहे. या महामार्गावर वेडीवाकडी वळणे, चढ उतारावर असणारा रस्ता, यामुळे येथील वाहन चालकांना एकंदरीत परिस्थितीचा अंदाज येत नाही. यामुळे डोंगर माथ्यावरून आलेले दगड गोटे, माती रस्त्यावर आली तर वाहनचालकांच्या त्वरित लक्षात येत नाही. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक पर्यटन स्थळे, असंख्य औद्योगिक क्षेत्र, तसेच शाळा कॉलेज असल्यामुळे या मार्गांवरून छोट्या मोठया वाहनाची सतत मोठया प्रमाणात वाहतूक सुरु असते.
सुकेळी खिंडीत पावसाळ्यात दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे तासंतास वाहतूककोंडी निर्माण होते. यामुळे प्रवाशी वर्गाचा खोळंबा होतो. या ठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी डोंगर खोदण्यात आले आहेत. डोंगराची माती सैल झाली असल्यामुळे दरड कोसळण्याचा धोका अधिक वाढला आहे.दिनकर सानप, सामाजिक कार्यकर्ते