Mumbai Goa highway traffic update:
रायगड : लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी कोकणाकडे निघालेल्या चाकरमान्यांच्या गणेशोत्सव प्रवासाची सुरुवातच यंदा मनस्तापाने झाली. मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सकाळपासून वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्याने वाहतूक कोंडीने उग्र रूप धारण केले. आज सकाळी नागोठणा उड्डाणपूल नजीक वाहतुकीच्या दोन ते तीन किलोमीट लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
अनेक ठिकाणी ८ ते ९ किलोमीटरपर्यंत वाहने खोळंबल्याने पाच-दहा मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण ते एक तासापेक्षा अधिक वेळ लागत होता. त्यातच सीएनजी भरण्यासाठी महामार्गावरील पंपांबाहेर अर्धा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याने गणेशभक्तांची चांगलीच तारांबळ उडत आहे. दुसरीकडे, मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर दिलासा मिळालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरही खालापूर टोलनाक्याजवळ - पुन्हा वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी घराकडे धावणाऱ्या - चाकरमान्यांना रस्त्यावरच अडकून पडण्याची वेळ येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होऊन गणेशोत्सवाचा प्रवास निर्विघ्न होईल, अशी आश्वासने दरवर्षी दिली जातात. मात्र, प्रत्यक्षात यंदाही रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, संथ गतीने सुरू असलेली कामे आणि माणगाव व इंदापूर येथील अपूर्ण बाह्यवळण रस्त्यांमुळे चाकरमान्यांचे हाल झाले. गणेशोत्सवाच्या तोंडावरही महामार्गाची ही अवस्था कायम असल्याने कोकणवासीयांचा शासनाप्रती संताप अनावर झाला आहे. 'महामार्ग पूर्ण करण्याची आश्वासने देणारे सरकार आणि संबंधित मंत्री आता कुठे आहेत?' असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक १ मे २०२६ रोजी सुरू झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडीला काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने खालापूर टोलनाक्याजवळ पुण्याच्या दिशेने पुन्हा लांबच लांब रांगा लागल्या. पुण्याकडून पालीमार्गे कोकणात जाणाऱ्या भाविकांची वाढलेली संख्या आणि सणासुदीच्या काळातील वाहतूक यामुळे हा मार्गही कोंडीत सापडला.