Mumbai Goa Highway Pudhari
रायगड

Mumbai Goa Highway: गोवा महामार्गाचे काम गणेशोत्सवापूर्वी पुर्ण करा, शिवसेनेची मागणी

शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्याकडून होणार आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी

पुढारी वृत्तसेवा

स्वप्नील पाटील

पेण: मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गेली 18 वर्षे होऊनही सदरचे काम आजही पूर्ण झाले नसल्याने कोकणवासीयांच्या नशिबी दुरावस्था झालेला महामार्गच का? अशी ओरड होत असताना सदर महामार्ग गणेशोत्सवापूर्वी तरी पूर्ण करा अशी मागणी नागरिकांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून होत आहे.

दरम्यान या महामार्गाची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे आज ( 26 ) रोजी पेण, नागोठणे येथे येत असल्याची माहिती तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांनी दिली आहे. तर पालकमंत्री भरत गोगावले यांच्या आदेशानुसार महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे शिवसेना नेते मिलिंद पाटील यांनी सांगितले आहे.

कोकणातील एकमेव असणाऱ्या महामार्गाच्या पनवेल पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम बऱ्याच ठिकाणी अपूर्ण आहे.पेण तालुक्यातील आमटेम- कलेटी पासून पुढे नागोठणे इंदापूर पर्यंत रस्त्याची अनेक ठिकाणी दुरावस्था असून सर्व्हिस रोड तर पेव्हर ब्लॉक बसवून भरले आहेत.

त्यातच हे पेव्हरब्लोक निखळले असून यातून अपघाताला निमंत्रण मिळू शकते अशी भयानक अवस्था या ठिकाणी आहे.त्यामुळे महामार्गावर वारंवार अपघात होण्याचे प्रमाण वाढत असताना रस्त्यावर पडलेले खड्डे काही ठिकाणी खचलेला रस्ता,अर्धवट पुलाचे काम, साईट पट्ट्या रखडलेल्या, महामार्गावर दिशादर्शक फलकांची वानवा,तसेच विद्युत रोषणाईची कमतरता.

सर्वत्र वाढलेले झाडे झुडपे, महामार्ग पूर्ण नसतानाही टोल आकारणी यासह इतरही समस्या कोकणवासीयांना जाणवत असल्याने प्रशासनासह शासनाने लक्ष देऊन महामार्गाचे काम पूर्ण करावे अशी मागणी शिवसेनेच्या माध्यमातून केली जात आहे.

तर दुसरीकडे पालकमंत्री भरत गोगावले यांच्या आदेशानुसार गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम काही ठिकाणी सुरू असल्याने हे काम गणेशोत्सवापूर्वी पुर्ण हाेण्याची शक्यता आहे.

शिवसेना युवा नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून आज महामार्गाची पाहणी होणार असून राज्यातील अनेक महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण होत असताना कोकणासाठी वरदान ठरलेला मुंबई- गोवा महामार्ग आजही दुरावस्थेत असल्याने येत्या गणेशोत्सवापूर्वी तरी महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण व्हावे ही आमची प्राथमिक मागणी असून त्याची पाहणी करण्यासाठी आमचे युवानेते आदित्य ठाकरे आज येत आहेत.
- समीर म्हात्रे, पेण तालुका प्रमुख (ठाकरे गट)
मंत्री भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर तातडीने त्यांनी या मुंबई - गोवा महामार्गाकडे विशेष लक्ष केंद्रित करून प्रशासनाला गणेशोत्सवापूर्वी जी सर्व अर्धवट कामे आहेत ती पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, त्याप्रमाणे काम युद्धपातळीवर सुरू असून गणेशोत्सवापूर्वी हे काम पूर्ण होईल याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे.
- मिलिंद पाटील, शिवसेना नेते-पेण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT