खांब : श्याम लोखंडे
मागील पंधरा सोहळा वर्षांपासून रखडलेल्या राष्ट्रीय मुंबई-गोवा महामार्गावर 66 वरील सुरू असलेल्या पावसात भयानक खड्डे पडण्यास सुरू झाली आहे. महामार्गावर भले मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांचा त्रास प्रवाशांसह वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. एवढ्येच नव्हे तर त्यात आता वाहने अडकून बंद पडत आहेत.
कोलाडपासून तळवली तिसे दरम्यान भला मोठा खड्डा पडल्याने त्यात वाहने अडकून बंद पडण्याच्या घटना घडत असल्याने याबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. तर दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की संबंधित मंत्री, पालकमंत्री आणि नेते मंडळी या रस्त्याची पाहणी करण्याचा आव आणतात. राज्यातील अनेक मंत्री तसेच काही केंद्रीय मंत्र्यांनी देखील गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या या खास राष्ट्रीय महामार्गाला पसंती देत पाहणी दौरा केला. त्यात त्यांच्या अनेक डेड लाईन देखील फोल ठरल्या मात्र महामार्गाचे काम आजतागायत पूर्ण होत नसल्याने आता अधिक कोणी मंत्री या महामार्गाची पाहणी करण्यास शिल्लक राहिले आहेत का असा संतप्त सवाल सर्व सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम करण्यासाठी अनेक ठेकेदार झाले. हा मार्ग तयार करण्यासाठी किती कोटींचा धुरळा उडाला हे मात्र गुलदस्त्यात. कोटीच्या कोटी खर्च करून देखील काही ठिकाणी अपूर्ण कामांचा फटका मात्र सर्व सामान्य प्रवासी नागरिक यांना बसत आहे तर ठेकेदाराच्या आडमुठेपणाच्या धोरणांमुळे मार्गालगतचे सर्व्हिस रोड गटारे लाईंची कामे आजही सुरू असल्याने ती अर्धवड कामे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आले. मात्र कोणाच्याही कारकीर्दीत हे काम पुर्ण होत नाही हे कोकण वाशियांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
श्रावण सुरू झाला गणेशोत्सव जवळ आला की दरवर्षी या खड्ड्यांचे दर्शन घेण्यासाठी सदरील आमदार, खासदार, मंत्री आणि पालकमंत्री, बांधकाम मंत्री या महामार्गावर पोहोचतात तेव्हा चोख बंदोबस्त आणि त्यांच्या चोह बाजूला अधिकारी आणि कार्यकत्यांचा गराडा, त्या गराड्यात मंत्र्यांनी दिलेले आदेश आणि फायली चाळत लिखापटी धावत धावत करणारे अधिकारी हे एकप्रकारे आता दिनक्रमच होउन बसले आहे. मात्र या खड्ड्यांबाबत नाही कुणा नेत्याला चिंता की नाही कुणा अधिकार्याला त्याची काळजी हे अनेकदा समोर आले आहे.
मागील वर्षी मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली, काही महिन्या पूर्वी उप मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचा यापूर्वी देखील अनेकदा पाहणी दौरा झाला. यावेळी देखील होईल ही अपेक्षा. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री देखील पाहणी करतात, मात्र रायगडसाठी पालकमंत्रीच नाही त्यामुळे वाली कोण असा प्रश्न चिन्ह समोर आहे.
रायगड हद्दीतील वडखळ ते इंदापूर दरम्यान अर्धवट अवस्थेत असलेली महामार्गाची कामे त्यात भयानक पडलेले खड्डे नागोठणे, खांब, कोलाड आंबेवाडी नाका, तळवली तिसे या ठिकाणी अक्षरशः मार्गाची चाळण झाल्याचे पहावयास मिळत आहे.तर तळवली तिसे दरम्यान तर चार ते पाच फूट खोल खड्डा पडला असल्याने चारचाकी वाहने त्यात अडकून बंद पडत असल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे. तरी सदरील खात्याचे अधिकारी वर्गाने यावर लवकरात लवकर उपाय योजना करून पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.
महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत आम्ही अधिकार्यावर वचक ठेवण्यात कमी पडलो का अशी कोणतीही प्रतिक्रिया या महामार्गावर पाहणी करणारे मंत्री महोदय मंत्र्यांकडून का ऐकायला मिळत नाही. हे मात्र न उलगडणारे कोडेच झाले आहे. तर दुसरीकडे गेली अनेक वर्षे रखडलेले काम कोलाड आंबेवाडी नाक्यावरील सर्व्हिस रोड, गटारे लाईची कामे तसेच तिसे तळवली दरम्यानचा मार्ग यावर होणार्या अपघास हा ठेकेदार जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. अधिकारी वर्गाने गांभीर्यपूर्क लक्ष केंद्रित करून महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी.जयेश घावटे, सामाजिक कार्यकर्ते, कोलाड