Mumbai Goa Highway Car Accident
कोलाड : मुंबई - गोवा महामार्गावरील पुई गावाच्या हद्दीत पुई बस स्टॉपजवळ कारने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीरपणे जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी (दि.१३) सकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ७.१५ वाजता फिर्यादीच्या ताब्यातील कंटेनर (एम.एच. ११ डी.डी. ०४२५) मुंबईकडून कोलाड कडे जात होता. पुई गावाच्या हद्दीतील पुई स्टॉपजवळ आल्यानंतर, मुंबईकडून कोलाडकडे येणाऱ्या एका कारने (एम.एच. ४६ सी.यू. ८४५३) धडक दिली.
या कार चालकाने, हुसबान अब्दुल हमीद कारविनकर (वय २०, रा. आंबेत, ता. म्हसळा, जि. रायगड), अतिवेगाने कार चालवली, परिणामी ती कंटेनरला जोरात धडकली. या धडकेत ओवेस सज्जाद सरखोत (रा. वणी पो. पुरार, ता. माणगांव, जि. रायगड) आणि सज्जाद अब्दुल सखुर सरखोत (रा. वणी पो. पुरार, ता. माणगांव, जि. रायगड) हे दोघे ठार झाले.
हुसबान अब्दुल हमीद कारविनकर आणि सरजित सज्जाद सरखोत (रा. वणी पो. पुरार, ता. माणगांव, जि. रायगड) हे दोघे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलिस व रेस्क्यू टीम यांनी तात्काळ मदत केली. अपघाताची नोंद कोलाड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. कोलाड पोलीस अधिक तपास करत आहेत.