Mumbai Goa National Highway pudhari photo
रायगड

Mumbai Goa National Highway : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक परिस्थिती कायम

पळस्पे फाटा ते पोलादपूर पट्ट्यात १७ धोकादायक ब्लॅक स्पॉट!

पुढारी वृत्तसेवा

महाड : श्रीकृष्ण बाळ.

तब्बल १८ वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची आधीच मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून पनवेल ते पोलादपूर पर्यंत असणाऱ्या सर्वच उड्डाणपूलांवर मोठ-मोठे खड्डे तर सर्विस रोड ची दुरावस्था झाली असताना आता पोलादपूर ते पळस्पे फाट्यापर्यंतच्या १५० किलोमीटर अंतराच्या पट्ट्यात १७ ब्लॅक स्पॉट असून हे जीव घेणे ब्लॅक स्पॉट वर राष्ट्रीय महामार्ग विभाग कधी उपाययोजना करणार असा सवाल मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास करणारे प्रवासी राष्ट्रीय महामार्ग विभागाला विचारीत आहेत.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या चौपदरीकरणाच्या कामाला तब्बल १८ वर्षे पूर्ण होत आहेत तरीदेखील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर ते पळस्पे फाटा पर्यंतच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर आधीच दुरावस्था झाली आहे. त्यातच या १५० किलोमीटर अंतरावरील कोल्हापूर पासून पनवेल पर्यंतच्या पट्ट्यातील सर्वच उड्डाणपूलांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून या जीवघेणा खड्ड्यामुळे प्रवाशांचे जीव जात असताना देखील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अद्याप डोळे उघडत नाहीत त्यात उड्डाणपूला खाली असणाऱ्या सर्व सर्विस रोडची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला सामोरे जाणे असल्याचा प्रकार या महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनुभवण्यास मिळत आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आधीच मोठ्या प्रमाणावर कोकणातील चाकरमान्यांच्या तक्रारी असताना व त्या तक्रारींचे निवारण करण्याऐवजी या तक्रारींचा पाढा दररोज वाढत आहे त्यातच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील १७ ब्लॅक स्पॉट हे जीव घेणे ठरत असून या ब्लॅक स्पॉट बाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग कधी लक्ष देणार असा सवाल या महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी विचारत आहेत.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर ते पनवेल हे अंतर१४० किलोमीटर असून या पट्ट्या तब्बल १८वर्षे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे या अठरा वर्षात १७ ठिकाणी असणाऱ्या ब्लॅक स्पॉटमुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांचे या ठिकाणी झालेल्या अपघातामुळे बळी गेले आहेत तर कित्येक जण जायबंदी झाले आहेत. मात्र तरीदेखील राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयात बसणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांना या ब्लॅक स्पॉट बाबत सुधारणा करण्याचे सुचत नसल्याबाबत कोकणातील जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे .

त्याचप्रमाणे याच महामार्गावरून मुंबई व रत्नागिरीच्या दिशेला जाणाऱ्या राज्यातील व केंद्रातील मंत्री खासदार आमदार यांचा प्रवास आलिशान गाडीतून पोलीस बंदोबस्तात होत असल्याने याबाबत या राज्यकर्त्यांना कोणतेही सुखदुःख नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे .मात्र या ब्लॅक स्पॉट बाबत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जा बाबत १०० वर्षाचे गॅरंटी देणारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गंभीरपणे लक्ष द्यावे अशी अपेक्षा कोकणवासीयांकडून व्यक्त होत आहे.

पोलादपूर ते पळस्पे पर्यंतच्या टप्प्यातील ब्लॅक स्पॉट

  • पेण : तरणखोप, रामवाडी, वाशी फाटा,

  • वडखळ: डोलवी

  • नागोठणे : सुकेळी खिंड, शेठ पळस

  • गोरेगाव: रेपोली, लोणेरे, टेम्पाले, तळेगाव पेट्रोल पंप

  • माणगाव : कशेणे

  • महाड : टेमपाले ते लाख पाले, लाख पाले ते पहेल, वीर

  • पोलादपूर : चोळई, धामणदेवी, लोहारे, पार्ले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT