Project-affected people
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन केले. Pudhari News Network
रायगड

रायगड : ओवळे खाडीत प्रकल्पग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन 

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी सिडको व अदानी कंपनीच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.१२) ओवळे फाटा येथील खाडीत जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले. येत्या ३० तारखेपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरी व रोजगार मिळाला पाहिजे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भराव, नदीपात्रामुळे पूरग्रस्त व ब्लास्टिंगमुळे ओवळे, दापोली, पारगाव, डुंगी, भंगारपाडा या गावांचे पुनर्वसन त्वरित व्हावे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जमीन संपादन करून सहा वर्षे झाली. त्याची नुकसान भरपाई द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी ओवळे खाडीमध्ये जलसमाधी आंदोलन केले. यावेळी सिडकोविरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच प्रत्येक गावाला खेळाचे मैदान मिळाले पाहिजे, विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव त्वरित द्यावे, यादेखील मागण्या यावेळी करण्यात आल्या.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र सिडकोचे अधिकारी आल्याशिवाय आम्ही बाहेर निघणार नाही. अन्यथा याच खाडीत नदीत जलसमाधी घेऊ, असे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले. त्यानंतर सिडकोचे अधिकारी येऊन त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या ऐकून घेऊन त्यांना आश्वासित केले. येत्या ३० तारखेला मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आणखी उग्र काम बंद आंदोलन केले जाईल, असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला.

SCROLL FOR NEXT