माणगाव: माणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रणधीर महादेव कनोजे यांनी ग्राहकांच्या घरी बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून टाकावेत, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा देत माणगाव उपविभागीय कार्यालयाला लेखी पत्र दिले होते.
याची दखल घेत उपकार्यकारी अभियंता, माणगाव उपविभाग यांनी २५ जुलै २०२६ रोजी क्रमांक उपकाअ/माण/मासं/११५१ लेखी उत्तर पाठवून स्पष्ट केले की, स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया केंद्र सरकार व राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावली आणि अधिसूचने नुसारच राबविण्यात येत आहे.
ही बाब कनोजे यांना लेखी स्वरूपात कळविण्यात आली असून, याबाबत कांही शंका असतील तर त्यावर चर्चा करून शंकेचे निरसन केले जाईल. तेव्हा उपोषणाचा मार्ग न स्वीकारता महावितरणला सहकार्य करावे, अशी विनंतीही या पत्राद्वारे करण्यात आली होती. या पत्राच्या प्रती उपविभागीय अधिकारी माणगाव महसूल उपविभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव पोलीस स्टेशन, तहसीलदार तहसील कार्यालय माणगाव आणि पोलीस निरीक्षक माणगाव पोलीस ठाणे यांनाही पाठविण्यात आल्या होत्या.
मात्र या पत्रानंतरही कनोजे यांच्या कडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने उपकार्यकारी अभियंता, माणगाव उपविभाग यांनी २८ जुलै २०२६ रोजी क्रमांक उपकाअ/माण/बी/ १६६७ पुन्हा एकदा लेखी पत्र पाठवले.
या पत्राद्वारे श्री. कनोजे यांना चर्चेसाठी महावितरण माणगाव उपविभाग कार्यालयात येण्याचे आमंत्रण देण्यात आले असून, उपोषणाचा मार्ग टाळून महावितरणला सहकार्य करण्याची पुनश्च विनंती करण्यात आली आहे.
या पत्राच्याही प्रती संबंधित महसूल, पोलीस व तहसील यंत्रणांना पाठविण्यात आल्या आहेत. दरम्यान, माणगाव शहर व परिसरातील ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने स्वतंत्र उपकेंद्र उभारण्यासाठी आवश्यक जागेची पाहणी सध्या महावितरणकडून सुरू असल्याचेही या खुलाशात नमूद करण्यात आले आहे.
स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया शासकीय नियमा नुसारच होत असून, ग्राहकांच्या शंकांचे निरसन चर्चेतून करण्याचा प्रयत्न महावितरणकडून केला जात असल्याचे या खुलाशातून स्पष्ट होते. माणगाव शहरात बसविेल्या स्मार्ट वीज मीटरला स्थानिक पातळीवर तीव्र विरोध होत असल्याचे वृत्त नुकतेच "दैनिक पुढारी" रायगडमध्ये २७ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध झाले होते.
"माणगावात स्मार्ट वीज मीटरला तीव्र विरोध, बसवलेले मीटर काढून टाकण्याची मागणी" या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या या बातमीची दखल महावितरणने घेतली असून त्या अनुषंगाने महावितरणच्या वतीने सविस्तर खुलासा करण्यात आला असून संबंधित उपोषणकर्त्यांना पत्र देऊन शासनाच्या महावितरणची भूमिका स्पष्ट केली असल्याचे महावितरणने दै. पुढारीकडे पाठवलेल्या पत्रातुन खुलासा केला.