उरण : राजकुमार भगत
मागील काही दिवसांपासून वादळी वार्यासह कोसळणार्या पावसामुळे विविध बंदरात सहाव्यांदा धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. यामुळे शनिवारीपासून गेटवे-एलिफंटा, गेटवे-जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली असल्याने या मार्गावरून प्रवास करणार्यांचे हाल झाले आहेत. शेकडो मच्छी विक्रेत्या, चाकरमानी तसेच व्यापारी या सागरी प्रवासी मार्गावरून प्रवास करतात.
भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या इशार्यात राज्यात 16 ते 21 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीसह वादळी वार्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान ताशी 50-60 किमी वार्यासह समुद्रात खवळलेली स्थिती राहणार असून, मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. यामुळे सलग सहा दिवस सागरी प्रवासी वाहतूक बंद राहणार आहे.
मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या दरम्यानची सागरी प्रवासी वाहतूकही शुक्रवारपासून बंद केल्याची माहिती मोरा बंदर विभागाकडून देण्यात आली. धोक्याच्या इशार्यानंतर या सागरी मार्गावरील प्रवासी, पर्यटक वाहतूक शुक्रवार दुपारपासूनच कोलमडली आहे. बुधवारी पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असल्याने हवामान विभागाने हवामान सुरळीत असल्याचे सांगितल्यास गुरूवारपासून या सर्व मार्गांवरील सागरी वाहतूक सूरू होण्याची शक्यता आहे.
खराब हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका सागरी प्रवासी वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यातच बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा दोन महिन्यांत पाचव्यांदा विविध बंदरांत लावला आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गेटवे ऑफ इंडिया-एलिफंटा गेटवे जेएनपीए सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक शुक्रवारपासून बंद करण्यात आली आहे.इक्बाल मुकादम, सचिव, गेटवे मुंबई जलवाहतूक संस्था, मुंबई