अलिबाग : अतुल गुळवणी
निरोप घेतो आता मानवा, आता आज्ञा असावी, चुकले काही तर क्षमा असावी, अशी आर्त विनवणी करत यंदाच्या मोसमी पावसाने शनिवारी (दि.11) यावेळच्या हंगामाचा निरोप घेईल, असा अंदाज हवामान विभागा वर्तविला असला तरी अजूनही वरुणराजा राज्यात रेंगाळलेलाच दिसत आहे.
पुढील दोन दिवसात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने पावसाची टर्म अजून संपुष्टात आलेली नसल्याचे जाणवत आहे. विशेष म्हणजे यंदा सरासरीपेक्षा २० टक्क्याहून अधिक जादा पाऊस पडला आहे. राज्यातील जलसाठा तुडूंब भरला असला तरी शेतीचे न भरुन येणारे नुकसान यावेळी झाल्याने बळीराजा हवालदिल झालेला आहे.
यंदाच्या मोसमात वैशखाताच आषाढधारा पाहता आल्या. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात रोहिणी नक्षत्राचा दुसरा प्रहर सुरू असतानाच पावसाला दणक्यात सुरुवात झाली. याचा मोठा फटका सर्वांनाच बसला. मात्र, वैशाख वणव्याने भाजून निघालेल्या धरतीला वरुणराजा गारवा देऊन गेला. तहानलेल्या मानवाला पाणी उपलब्ध झाले. जूनमध्ये पाऊस जेमतेमच पडला. जुलैमध्ये आषाढात अपेक्षेसारखा पाऊस कोसळलाच नाही. श्रावणातही कधी रिमझिम तर कधी धो धो कोसळत वरुणराजा कोसळत राहिला. भाद्रपदामध्ये ऐन गणेशोत्सवात पावसाने सतत हजेरीच लावली. अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच राहिली. अखेरच्या टप्प्यात वरुणराजाने जणू हाहाकारच उडवून दिला. विशेष करुन मराठवाड्यात पावसाने हाहाकारच माजविला. आठ दिवस सारा मराठवाडा पाण्याखाली होता. लाखो हेक्टर शेती वाहून गेली. अनेकजण मृत्यूमुखीही पडले कोट्यवधींचीही हानी झाली. त्यातून कसे सावरायचे याची चिंता आता मराठवाड्यातील जनतेला पडलेली आहे. हवामान विभागाप्रमाणे पंचांगकर्त्यांनीही पर्जन्य अंदाज व्यक्त केले होते. त्यानुसारही वरुणराजाने हजेरी लावल्याचेही यावेळीही दिसून आले.