अलिबाग (रायगड) : पावसाळी पर्यटनासाठी रायगडात ठिकठिकाणी येणार्या पर्यटकांच्या अतिउत्साहीपणाचा त्रास सरकारी यंत्रणेसह आता सर्वसामान्यांनाही होऊ लागल्याने या अतिउत्साही पर्यटकांना आवरा म्हणण्याची वेळ आली आहे.
रविवारी (दि.27) अलिबाग समुद्रकिनारी मद्यधुंद पर्यटकांनी एकच धिंगाणा घातला. याचा त्रास नेहमी किनारी फिरावसाय येणार्या स्थानिकांना मोठ्या प्रमाणात झाला. दुसरा प्रकार पांडवकडा येथे घडला. बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात धबधब्यावर आलेल्या पर्यटकांच्या हुल्लडबाजीने सुरक्षा यंत्रणा वैतागून गेली.
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी अलिबाग समुद्रकिनारी धिंगाणा घातला. दारूच्या नशेत हा प्रकार घडला. पर्यटकांना ताब्यात घेऊन त्यांना अलिबाग मधील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. ही घटना रविवारी (दि.27) सायंकाळी घडली.पोलिसांकडू मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील हे चौघेजण पर्यटक आहेत. शनिवार व रविवार सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी हे पर्यटक अलिबागला आले होते. दुपारनंतर अलिबाग समुद्रकिनारी दारूच्या नशेत असताना त्यांनी धिंगाणा घातला. समुद्रकिनारी फिरण्यास आलेल्या अन्य पर्यटकांना त्यांचा प्रचंड त्रास होऊ लागला. ही बाब अलिबाग पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या पर्यटकांना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तरी देखील ते पर्यटक कोणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर त्यांना ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात सायंकाळी वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.
दरम्यान, धबधब्याच्या ठिकाणी जाण्यावर प्रशासनाने आधीच बंदी घातली असून रस्त्यांवरही प्रतिबंधक फलक लावण्यात आले आहेत. तरीही पर्यटक मोठ्या संख्येने पाण्यात उतरतात, त्यामुळे अशा धोकादायक भागांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पनवेल : बंदी असतानाही सुरक्षा यंत्रणेची नजर चुकवून पांडवकड्यावर गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागल्याने त्यांना आवर घालताना सुरक्षा यंत्रणेची दमछाक होऊ लागली आहे.पर्यटकांनी धबधबा परिसरात जाऊ नये यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरिकेटस बसविण्यात आलेले आहेत.ते बॅरिकेट पाडून यंत्रणेला चकवा देत हे पर्यटक य परिसरात येत असल्याचे दिसत आहे.काही उत्साही पर्यटक थेट पाण्यात उतरत आहेत.तर काहीजण धोकादायक ठिकाणी जाण्याचे धाडस करताना दिसतात.यापैकी काही पर्यटक अडकून पडल्याच्या घटनाही गेल्या दोन दिवसात घडलेल्या आहेत. नजर चुकवून पांडव कडा तसेच सेक्टर सहा येथील धबधबा मध्ये अडकले होते रेस्क्यू ऑपरेशन करून त्याना काढण्यात यश आले . रविवारी पुन्हा खारघर च्या ड्रायव्हिंग रेंज येथे सकाळी लवकर अनेक जण पाण्याच्या धबधबा गेले होते काही तासात पोलीस घटना स्थळी येऊन अनेकांना बाहेर काढले .
सध्या पावसाळी दिवस आहेत. त्यामुळे समुद्राला मोठे उधाण येत आहे.मोठमोठ्या लाटांचे तांडव किनारी धडकत असते.ते पाहतानाही अंगावर शहारे येतात.अशावेळी सर्वांनीच योग्य ती खबरदारी घेऊन आनंद लुटला पाहिजे.पण दुर्दैवाने बाहेरुन येणार्या पर्यटकांचा अतिउत्साह अशावेळी मोठ्या प्रमाणात उफाळून येताना दिसतो.तोकड्या कपड्यात वावरत लाटांवर स्वार होण्याचा प्रयत्न अनेकदा जीवावर बेतल्याचेही दिसते.सध्या अलिबाग किनारी मोठ मोठे दगड बांधकामासाठी आणलेले आहेत.तेथे उभारुन सेल्फी काढतानाही योग्य ती सावधगिरी बाळगली जात नसल्याचे जाणवते.