महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर केलेल्या हल्ल्यासंदर्भात महाड पोलिसांकडून आरोपींना अटक न केल्याबद्दल मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी बुधवारी महाड शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलिसांना या संदर्भात केलेल्या कारवाईचा जाब विचारला. pudhari photo
रायगड

Avinash jadhav : महाड यूपीमध्ये आहे की बिहारमध्ये,आरोपींना अटक न केल्यास महाड बंद

मनसे नेते अविनाश जाधव यांचा शहर पोलीस प्रशासनाला इशारा , कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

महाड : शनिवारी दुपारी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर केलेल्या हल्ल्यासंदर्भात महाड पोलिसांकडून आरोपींना अटक न केल्याबद्दल मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी बुधवारी महाड शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलिसांना या संदर्भात केलेल्या कारवाईचा जाब विचारला. यावेळी त्यांनी महाड युपीत आहे की बिहारमध्ये असा सवाल विचारला.आरोपींना शनिवारपर्यंत अटक न केल्यास सोमवारी महाड बंदचा इशाराही त्यांनी दिला आहे.

यावेळी त्यांनी चार दिवस झाल्यानंतर ही आरोपी खुलेआम कार्यक्रमातून फिरत असल्याचे चित्र भ्रमणध्वनीद्वारे दाखवून महाड यूपीमध्ये आहे की बिहारमध्ये असा रोखठोक सवाल महाडचे डीवायएसपी शंकर काळे व शहर पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांना केला. महाड मध्ये माफिया राज सुरू झाल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला. येत्या शनिवारपर्यंत संबंधित आरोपींना अटक न केल्यास सोमवारी महाड बंद करणार असल्याची घोषणा त्यांनी महाड शहर पोलीस ठाण्यातच दिला. याकरिता महाड मधील विविध सामाजिक संस्था उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह सर्व विचारी मंडळी सहभागी होतील असा विश्वासही व्यक्त केला.

महाड मधील नागरिक व व्यापारी बांधवांनी देखील या कृत्याचा निषेध म्हणून आमच्या बंदमध्ये सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. महाड पोलीस राजकीय दबावाखाली वावरत असल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला. महाराष्ट्र पोलिसांबद्दल मनसे व मला प्रचंड आदर असून पोलिसांनी ठरविल्यास कोणतीही घटना पूर्ण करणे अशक्य नाही असे मत प्रदर्शित केले.

महाड शहर पोलीस ठाण्याला भेट देण्यापूर्वी पंकज उमासरे यांच्या चवदार तळे येथील फोटो फ्रेम मेकर्स दुकानाला भेट देऊन झालेल्या घटनेची माहिती घेतली. यावेळी त्यांच्या समवेत मनसे कामगार आघाडीचे प्रमुख संजय नाईक, योगेश चिले, चेतन उतेकर. उबाठाचे शिरगाव सरपंच सोमनाथ ओझर्डे आदी प्रमुख पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

शहर पोलीस ठाण्यात पंकज उमासरे यांच्या कुटुंबीयांकडून आरोपींचे गेल्या दोन दिवसातील महाड मधील असलेल्या विविध कार्यक्रमातील सहभागाचे छायाचित्र दाखविण्यात आले. महाड शहर पोलीस ठाण्यात मनसेच्या वतीने 109 कलमांतर्गत या गुन्ह्याप्रकरणी विकास गोगावले यांना अटक करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे त्यांनी केली आहे.

महाडला आल्यावर हे महाड आहे की बीड आहे का असा प्रश्न पडल्याचे सांगत अविनाश जाधव यांनी ना गोगावले यांच्यासह पोलीस प्रशासनाच्या कारभारावर ताशोरे ओढले. महाड मध्ये माफिया राज चालू असल्याचा आरोप केला.आरोपी नेत्या सबत फिरत असल्याचा फोटो सादर केला बीड मध्ये माफिया राज सुरू आहे तिथे कायदा सुव्यवस्था चा बोजावरा उडाला आहे तशीच अवस्था महाड ची झाली असल्याची टीकाही त्यांनी केली.

महाडवासियांचे जीवन धोक्यात

आयत्या मिळालेल्या या संधीमुळे महाडमधील नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून हा प्रकार असाच सुरू राहिल्यास घरात घुसून भगिनींवरती हात टाकण्यास देखील हे गुंड मागे पुढे पाहणार नाहीत, असा इशारा देऊन त्यांनी या महाडच्या सोमवार बंदमध्ये ठाणे मुंबई येथील मनसेचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असे जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT