रायगड

MNS 20th Anniversary Raigad | रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा २० वा वर्धापन दिन; राज ठाकरेंनी फुंकले आगामी राजकीय वाटचालीचे रणशिंग

Raj Thackeray | थेट रायगडावरून वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय मनसेच्या भविष्यातील रणनीतीचे महत्त्वाचे संकेत देत असल्याचे स्पष्ट करण्यात आले

पुढारी वृत्तसेवा

इलियास ढोकले

किल्ले रायगड: स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीने पावन झालेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) २० वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह सहकुटुंब उपस्थित होते.

शिवरायांच्या चरणी नतमस्तक

वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज ठाकरे यांनी रोपवेद्वारे किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन त्यांनी महाराष्ट्राच्या या आराध्य दैवताला अभिवादन केले. मनसेच्या इतिहासात प्रथमच हा सोहळा एखाद्या शहरात न होता रायगडाच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आला होता, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच जोश पाहायला मिळाला.

डिजिटल सदस्य नोंदणीचा शुभारंभ

यावेळी राज ठाकरे यांनी पक्षाच्या आगामी राजकीय वाटचालीबद्दल सूचक भाष्य केले. कार्यकर्त्यांनी पुढील काळात कशा प्रकारे काम करायचे, याबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. याच सोहळ्यात मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेत डिजिटल नोंदणीवर अधिक भर दिला जाणार असून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक तरुणांना पक्षाशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

भविष्यातील वाटचालीचे संकेत

विविध शहरांऐवजी थेट रायगडावरून वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय मनसेच्या भविष्यातील रणनीतीचे महत्त्वाचे संकेत देत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना दिलेले आदेश आणि सुरू केलेली नोंदणी मोहीम, पक्षाच्या भविष्यातील विस्तारासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT