महाड: पुढारी वृत्तसेवा: राज्याचे नवनिर्वाचित रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारण्याआधी बुधवारी (दि.२५) दुर्गराज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक झाले. त्यानंतर गडावरील शिरकाई देवी आणि जगदिश्वराचे दर्शनही घेतले. राज्यात पुढील पाच वर्ष महायुतीचे सरकार जनतेच्या सेवेसाठी आणि विकासावर भर देऊन राज्यात पुन्हा सुराज्य येवो, अशी प्रार्थना त्यांनी केली. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, किल्ले रायगडची गेली अनेक वर्ष स्वछता मोहीम राबविणारे जयहिंद व्यायाम मंडळ व मावळा फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच गोगावले यांनी कौतुक केले. त्यानंतर रायगडावर सुरू असलेल्या कामांची पाहणी करत माहितीही घेतली. यानंतर भरत गोगावले यांनी रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथील माँ साहेब जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेत नतमस्तक झाले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बंधू तरडे, माजी तालुका प्रमुख सुरेश महाडिक, शिवसेना जिल्हा प्रवक्ता नितीन पावले, शहर प्रमुख डॉ. चेतन सुर्वे, माजी नगरसेवक दीपक सावंत, सुनिल आगरवाल, नितीन आतै, उपशहर प्रमुख निखिल शिंदे, राजू देशमुख, ॲड. सनी जाधव, रोहन धेंडवाल, प्रमोद शेडगे आदी उपस्थित होते.