म्हसळा तालुक्यातील शिक्षण विभाग नेहमीच चर्चेत राहिला आहे. म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा मेंदडी कोंड येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यतच्या वर्गात एकूण 86 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. असे असताना 86 विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी फक्त दोनच शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळे म्हसळा शिक्षण विभागाचे अजब कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून शिक्षण विभाग काय नियोजन करते असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजिप मेंदडी कोंड शाळेतील ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे 2 शिक्षक 86 विद्यार्थ्यांना काय शिकविणार? त्यातच या शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच इतरही प्रशासकीय कामकाज पाहावे लागते. त्यामुळे आमच्या मुलांच्या भवितव्याचे काय होणार असा प्रश्न मेंदडी कोंड येथील पालक वर्ग विचारत असून किमान अजून 2 कायम स्वरुपी शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे, म्हसळा पंचायत समिती गटविकास अधिकारी माधव जाधव, गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांचेकडे लेखी निवेदन पत्र देऊन केली आहे.
महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे या सोमवारी म्हसळा तालुका दौर्यावर आल्या होत्या यावेळी मेंदडी कोंड येथील पालकांनी मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वरे कैफियत मांडून शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि 2 शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी मंत्री आदिती तटकरेंनी उपस्थित गटशिक्षणाधिकार्यांना सूचना करून शिक्षक देण्यास सांगितले आहे.
मेंदडी कोंड येथील 40 ते 50 पालकांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव जाधव यांचीही भेट घेऊन लेखी निवेदन देऊन शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षिण नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून देऊन शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी गटविकास अधिकार्यांनी उपस्थित पालक वर्गाला लवकरच शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले.
आमच्या मेंदडी कोंड येथील जिल्हा परिषद शाळेत एकूण 86 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी 49 विद्यार्थी आदिवासी समाजाचे आहेत. एवढी मोठी पटसंख्या असताना देखील फक्त 2 शिक्षक उपलब्ध आहेत. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. आमच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य कसे घडणार असा आम्हाला प्रश्न पडला आहे. त्यामुळे आम्ही मंत्री आदिती तटकरे, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन अजून 2 शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.प्रज्ञा संदीप कांबळे पालक-मेंदडी कोंड