म्हसळा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा, नगराध्यक्षपदी शाहिद जंजिरकर विराजमान pudhari photo
रायगड

Mhasla Nagar Panchayat : म्हसळा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा, नगराध्यक्षपदी शाहिद जंजिरकर विराजमान

शिंदेसेना-काँग्रेस युतीची नवीन समीकरणे

पुढारी वृत्तसेवा

म्हसळा शहर: म्हसळा नगरपंचायतीच्या राजकारणात अखेर अपेक्षेप्रमाणे मोठे सत्तांतर घडले असून नगराध्यक्ष निवडणुकीत शिंदे शिवसेनेने बाजी मारत नगरपंचायतीवर पुन्हा भगवा फडकविला आहे. काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेनेचे शाहिद जंजिरकर यांची नगराध्यक्षपदी निवड झाली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत शाहिद जंजिरकर यांना ९ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेडगे यांना ६ मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक नगरसेवक शिवसेनेच्या गोटात गेल्याने तो मतदान प्रक्रियेदरम्यान अनुपस्थित राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

१७ सदस्यसंख्या असलेल्या म्हसळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ सदस्य होते. मात्र त्यापैकी ८ नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका दुसरीकडे ठाकरे गटातील एका नगरसेवकाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असला तरी काँग्रेसच्या सोफिया हळदे, मोवीद शेख या दोन नगरसेवकांनी शिंदे शिवसेनेच्या बाजूने मतदान केल्याने ९ विरुद्ध ६ अशी मतांची विभागणी झाली. शिंदे सेनेत गेलेल्या माजी नगराध्यक्षा या आधीच अपात्र ठरल्याने त्यांना या निवडणुकीत सहभागी होता आले नाही.

गेल्या नऊ वर्षांपासून म्हसळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र मंत्री भरत गोगावले यांच्या रणनीतीमुळे या सत्तेला सुरुंग लागल्याची चर्चा राजकीय स्तरावर सुरू आहे. या घडामोडींमुळे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांना त्यांच्या मतदारसंघात मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.

शिवसेनेचा जल्लोष

नगराध्यक्ष निवडीचा निकाल जाहीर होताच शिंदे शिवसेना आणि काँग्रेस कार्यकत्यांनी मोठा जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांनी त्यांना सहकार्य केल.

योग्यवेळी निर्णय घेऊ - तटकरे

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले. याबाबत प्रतिक्रिया देताना खा. सुनील तटकरे यांनी याबाबत योग्यवेळी निर्णय घेऊ असे सुचित केले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जे अपात्र नगरसेवक आहेत त्यांच्यासाठी व्हीपही जारी केलेला होता. मात्र, तो झुगारुन अपात्र नगरसेवकांनी शिवसेनेलाच साथ दिल्याने राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

जंजिरकर यांना झालेले मतदान

उमेदवार शाहिद जंजिरकर १) राखी करंबे, २) कमल पवार, ३) असहल कादिरी, ४) शाहिद जंजिरकर, ५) सुमैय्या आमदानी६) मेहजबीन दळवी, ७) सारा म्हसलाई (सर्व शिवसेना) ८) सुफियान हळदे ९) डॉ. मुविझ शेखर (दोघे काँग्रेस)

राष्ट्रवादीच्या यांच्या बाजूने मतदान केलेले नगरसेवक

उमेदवार सुनिल शेडगे: १) अनिकेत पानसरे २) संजय कर्णिक, ३) सुनील शेडगे, ४) सरोज म्हशीलकर, ५) जयश्री कापरे, ६) नौसिन चोगले. अनुपस्थित नगरसेवक संजय दिवेकर (राष्ट्रवादी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT