म्हसळा तालुक्यातील मौजे कासारमलाई येथे रिक्षा दुभाजकाला धडकल्याने तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.  Pudhari News Network
रायगड

Mhasala Taluka Accident News : म्हसळ्यात रिक्षा अपघातात तिघे ठार

मृतात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा समावेश, गावावर शोककळा

पुढारी वृत्तसेवा

म्हसळा (रायगड) : म्हसळा तालुक्यातील मौजे कासारमलाई येथे रिक्षा दुभाजकाला धडकल्याने तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे कणघर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतात संतोष सावंत हे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी होते.

संदेरी येथे झालेल्या कुणबी समाजाच्या सभेत सहभागी होऊन संतोष नाना सावंत (वय ३८) आपल्या रिक्षामध्ये सात जणांना घेऊन परतत होते. मात्र कासारमलाई फाट्याजवळ रस्त्याचा तीव्र उतार आणि रिक्षाचा वेग यामुळे संतोष सावंत यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी रिक्षा थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. धडकेचा जोर एवढा होता की, संतोष सावंत यांचा जागीच मृत्यू झाला.

मृत आणि जखमींची नावे अशी...

या अपघातात शांताराम पांडुरंग धोकटे (वय ७४) आणि शामा तुकाराम धोकटे (वय ५५) या दोघांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, संजना संतोष मगर (वय ३७), प्रभाकर पांडुरंग धाडवे (वय ७३), संतोष रामचंद्र मगर (वय ३८) आणि पांडुरंग रामचंद्र धोकटे (वय ५०) हे चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

घटनास्थळावर मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात हलवले. म्हसळा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. संपूर्ण कणघर परिसरातील ग्रामस्थ हे एकाच गावातील असल्यामुळे या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. एकाच वेळी तीन व्यक्तींना गमावल्याने गावात शोकाकुल वातावरण आहे. मृत्यू पावलेले तिघेही गावातील ज्येष्ठ आणि परिचित व्यक्ती असल्याने त्यांच्या निधनाची तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांची चौकशी सुरू

अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. रिक्षा रस्त्याच्या कडेला पलटी होऊन काही प्रवासी खाली फेकले गेले तर काही रिक्षाखाली दबले. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. पोलिसांना कळताच म्हसळा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. मात्र प्राथमिक अंदाजानुसार रिक्षा भरधाव वेगात होती आणि नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT