Political News Pudhari
रायगड

Mhasala political twist: म्हसळ्यात राजकीय ट्विस्ट; जिंकूनही गमावलं नगराध्यक्ष पद

नवनिर्वाचित नगराध्यक्ष शाहिद जंजिरकर यांचा चार दिवसांतच राजीनामा

पुढारी वृत्तसेवा

म्हसळा, अलिबाग: म्हसळा नगरपंचायतीच्या राजकारणात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याला आता आणखी एक नवे वळण मिळाले असून नवनिर्वाचित नगराध्यक्ष शाहिद जंजिरकर यांनी अवघ्या चार दिवसांतच रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्याकडे आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. परिणामी म्हसळा तालुक्यांच मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण होवून राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे या दोन नेत्याच्या राजकीय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या, म्हसळा नगरपंचायतीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सत्ता संघर्षामुळे सतत राजकीय उलथापालथ होत असून अवघ्या चार महिन्यांत तीन नगराध्यक्ष विराजमान झाल्याने नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

7 मे रोजी झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस आघाडीच्या पाठिंब्यावर शाहिद जंजिरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनिल शेडगे यांचा 9 विरुद्ध 6 मतांनी पराभव करून नगराध्यक्षपद पटकावले होते.या विजयात काँग्रेसच्या दोन नगरसेवकांच्या पाठिंब्याची निर्णायक भूमिका असल्याचे बोलले जात होते.

मात्र निवडीनंतर अवघ्या चार दिवसांतच वरिष्ठांच्या आदेशानुसार शाहिद जंजिरकर यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने नगरपंचायतीच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोड घडली आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 13 पैकी नगराध्यक्षा सहित सात नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर बंदी कायद्यान्वये संबंधित नगरसेवकांवर कारवाई करत त्यांना कायद्याने अपात्र ठरविण्यात आले होते.या निर्णयाविरोधात संबंधित नगरसेवकांनी नगरविकास खात्याकडे दाद मागितल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिलासा दिल्याचे सांगितले जाते.

त्या पार्श्वभूमीवर 7 मे रोजी पुन्हा निवडणूक पार पडली आणि शाहिद जंजिरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाले.मात्र पक्षांतर केलेल्या सात नगरसेवकांचा स्वतंत्र गट नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना व्हीप बजावण्यात आला होता. दरम्यान पुन्हा एकदा पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यात संबंधित नगरसेवक अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

म्हसळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकी बाबत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार 7 मे रोजी शिवसेनेने निवडणूक लढवू नये असा निर्णय झाला होता. या बैठकीस मंत्री भरतशेठ गोगावले हे देखील उपस्थित होते. तरी सुद्धा निवडणूक लढवली गेली. अखेर उप मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आलेल्या आदेशानुसार आज नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. योग्यवेळी पूढील निर्णय होईल.
- खा.सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT