Mhapral Weekly Market Pudhari
रायगड

Mhapral Weekly Market: वाकडचा माणूस अजूनही म्हाप्रळच्या बाजारातच रमतो! मॉलच्या जमान्यातही म्हाप्रळचा आठवडा बाजार सुपरहिट

सुकी मासळी खरेदीसाठी मोठी गर्दी

पुढारी वृत्तसेवा

रघुनाथ भागवत

खाडीपट्टा: खाडीपट्टयातील नागरिकांची म्हाप्रळ येथील आठवडा बाजाराला मोठी पसंती मिळत असून या बाजारात दर आठवड्याला हजारोंची उलाढाल होत आहे. विशेषतः सुक्या मासळीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे.

त्याचबरोबर कटलरी सामान, तयार कपडे, हॉटेल्स, मिठाई, ओली मासळी, इलेक्ट्रिक वस्तू, धान्य, भाज्या, भांडी तसेच मसाल्याचे पदार्थ खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

म्हाप्रळ बाजार अनेक वर्षांपासून सुरू असून, पूर्वी दळणवळणाची साधने अपुरी असतानाही खाडीभाग व किनारपट्टीतील नागरिक या आठवडा बाजारावर अवलंबून होते. घरातील आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या उत्साहाने या बाजारात येत असत.

त्या काळात बाणकोट येथून कोलणी लाँचने सुकी मासळी विक्रीसाठी आणली जात असे. आज दळणवळणाची साधने सुधारली असली तरी बाणकोटच्या कोळणी महिला आजही स्वतःच्या वाहनांमधून सुकी मासळी विक्रीसाठी येथे येतात. हे या बाजाराचे मोठे वैशिष्ट्य मानले जाते.

दर शुक्रवारी भरणाऱ्या या आठवडा बाजारामुळे खाडीपट्टयातील तसेच आसपासच्या गावांतील नागरिकांना विविध वस्तूंची खरेदी जवळच्या परिसरातच करता येत असल्याने या बाजाराला मोठी पसंती मिळत आहे. मोठमोठ्या मॉलच्या गर्दीत हरवलेला गावाकडचा माणूस आजही या पारंपरिक बाजारात खरेदी करताना दिसतो.

औद्योगिकीकरण, विकास आणि शहरीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे गावातील चालीरीती, परंपरा आणि संस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे. गावांमधील सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांबरोबरच आठवडा बाजारांची परंपराही कमी होताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना खरेदीसाठी शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे. पाश्चिमात्य संस्कृतीतून आलेल्या मॉल संस्कृतीमुळे सामान्य गावकऱ्यांवर आर्थिक ताण वाढत असल्याचे चित्र आहे.

बाजाराची व्यवस्था शिस्तबद्ध पद्धतीत

खाडीपट्टयातील जनतेसाठी म्हाप्रळ येथील आठवडा बाजार हा मोठा आधार ठरत आहे. येथे सुक्या मासळीबरोबरच कटलरी सामान, तयार कपडे, हॉटेल्स, मिठाई, ओली मासळी, इलेक्ट्रिक वस्तू, धान्य, भाज्या, भांडी आणि मसाल्याचे पदार्थ माफक दरात उपलब्ध होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

म्हाप्रळ ग्रामपंचायतीने बाजाराची व्यवस्था सुव्यवस्थित जागेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने केली आहे. चिंभावे, गोमेंडी, वराठी, बेबलघर, तेलंगे, ओवळे, वलंग, सोनघर, जुई, कुंबळे, खुटील, तुडील, आदे, भेलोशी तसेच आंबेत आणि म्हाप्रळ परिसरातील नागरिक या बाजाराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT