खारघर : खारघर मधील मीनाक्षी जयस्वाल खून खटल्यामधील अंतिम सुनावणी आज पनवेल येथील कोर्टात पार पडली. साडेदहा वर्ष चाललेल्या या खून खटल्याप्रकरणी तीनही आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा न्यायमूर्ती एस. सी. शिंदे यांनी सुनावली.
खारघर येथील वकील मीनाक्षी जयस्वाल यांच्या खळबळजनक हत्येनंतर एका दशकानंतर पनवेल सत्र न्यायालयात दोषी ठरलेल्या तीन आरोपींना गुरुवारी सकाळी 12 वाजता कोर्टात आणण्यात आले. पनवेल आणि खारघरमधील नागरिकांचे तसेच कायदेशीर समुदायाचे या खटल्याच्या निकालाकडे लक्ष लागले होते.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा अधिवक्ता मीनाक्षी जयस्वाल खारघर येथील वास्तु विहार सेलिब्रेशन इमारतीत राहत होत्या. त्यांचे पती डॉ. संतोष जयस्वाल हे वरिष्ठ दर्जाचे दिवाणी न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. १९ डिसेंबर २०१४ रोजी मीनाक्षी जयस्वाल यांची त्यांच्याच राहत्या घरी हत्या करण्यात आली होती.
तपासादरम्यान, खारघर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. मनिंदर सिंग उर्फ मिठू, विनायक थवरा चव्हाण, सूरज रामभवन जयस्वाल आणि सुरेंद्रकुमार चमनलाल बत्रा अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मीनाक्षी जयस्वालसाठी काम करणारा चव्हाण हा या गुन्ह्याचा सूत्रधार होता. असे पोलिस तपासात समोर आले होते. सुरुवातीला खटला अलिबाग सत्र न्यायालयात सुरू झाला होता. परंतु नंतर तो नव्याने स्थापन झालेल्या पनवेल सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. खटल्यादरम्यान आरोपी सुरेंद्रकुमार बत्रा यांचे निधन झाले.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. शिंदे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. प्रसिद्ध विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी राज्य सरकारची बाजू मांडली, तर अॅड. प्रसाद पाटील यांनी त्यांना मदत केली. खटल्यादरम्यान एकूण २० साक्षीदार तपासण्यात आले. सर्व पुरावे आणि साक्षींचे सखोल मूल्यांकन केल्यानंतर, न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले.
आरोपींना दोषी ठरवून खालीलप्रमाणे शिक्षा देण्यात आली आहे.
1) मनिंदर सिंग सुखविंदर सिंग बाजवा उर्फ जोरावर सिंग उर्फ मिठू बलकार सिंग अथवाल (वय 33 वर्ष) जन्मठेप व 70000/- रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने शिक्षा( दुहेरी जन्मठेप ))
2) विनायक धावरा चव्हाण (वय 56 वर्ष) जन्मठेप व 70000/- रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने शिक्षा
3) सुरज राम भवन जयस्वाल (वय 36 वर्ष) जन्मठेप व 70000/- रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने शिक्षा)
4) सुरेंद्रकुमार जमनलाल बत्रा (वय 53 वर्ष) (आरोपी मयत)