माथेरान मध्ये ई रिक्षा सुरू झाल्यापासून या सेवेचा लाभ समस्त माथेरान कर घेत असून यापूर्वी सुरुवातीला ज्यांनी ज्यांनी ह्या सेवेला प्रचंड प्रमाणात विरोध दर्शवला होता त्याच मंडळींनी आता सर्रासपणे ह्या सुविधांचा स्वीकार केल्यामुळेच जेमतेम वीस ई रीक्षांच्या जागी एकूण अपेक्षित असणार्या 94 ई रिक्षांना लवकरात लवकर प्राधान्य द्यावे अशी मागणी सध्या तरी जोर धरू लागली आहे.
पायलट प्रोजेक्ट म्हणून सहा महिन्यांसाठी सुरुवातीला वीस ई रिक्षांना परवानगी देण्यात आली आहे. डिसेंबर 2024 मध्ये हा पायलट प्रोजेक्ट पूर्ण होत असल्याने सुट्ट्यांच्या हंगामातच नव्हे तर ऐन मंदीच्या काळात सुध्दा केवळ ई रिक्षा उपलब्ध असल्याने इथे मोठया प्रमाणावर पर्यटन बहरत आहे. परंतु फक्त वीस रिक्षा स्थानिक नागरिक, पर्यटक आणि शालेय विद्यार्थी यांना सेवा उपलब्ध करून देऊ शकत नाहीत.अधूनमधून विजेचा खेळखंडोबा सातत्याने सुरू असतो त्यामुळे ह्या वाहनांना चार्जिंग करणे कठीण बनते.
त्यातच शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना जवळपास मोफतच ही सेवा पुरवली जात आहे ऐन गर्दीच्या वेळी एखाद्या अधिकार्यांचा फोन आला की ताबडतोब त्यांना ई रिक्षा उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते यातून अनेकदा वादविवाद होत असतात. शासनाने यासाठी साधकबाधक विचार करून आगामी सुट्ट्यांचा हंगाम लक्षात घेऊन लवकरच ह्या ई रिक्षाच्या सेवेत वाढ करावी अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे.
रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याने वारंवार गाड्यांना खर्च करावा लागत आहे. यापुढे चांगल्या कंपनीच्या मजबुत ई रिक्षा उपलब्ध झाल्यास आम्हाला सोयीचे होईल.शैलेश भोसले, ई रिक्षा चालक
शाळेच्या विद्यार्थ्यांना अगोदर प्राधान्य दिले जाते. त्यानंतर प्रवाशांना ही सेवा उपलब्ध करून देत आहोत परंतु या रिक्षांची संख्या खूपच कमी आहे त्यासाठी यामध्ये वाढ होणे गरजेचे आहे.रुपेश गायकवाड, ई रिक्षा चालक
आम्ही लाईनीत उभे असतो पण मध्येच एखादा गाववाला किंवा अधिकारी येतो आणि पटकन बसून जातो. त्यामुळे एवढा वेळ उभे राहून काही उपयोग होत नाही. आम्ही लोक इथे आलो तरच या लोकांना रोजीरोटी भेटणार आहे दुसरं इथं काही साधन नाही. त्यासाठी गव्हर्नमेंटने या पब्लिक स्पॉटवर रिक्षा वाढवुन पब्लिकला सेवा द्या.शूल वैरागी, पर्यटक मुंबई