माथेरान : मिलिंद कदम
माथेरान येथे प्रवेश करण्यासाठी नेरळ मार्गे एकमेव घाट उपलब्ध आहे 1972 साली माथेरान करांनी श्रमदान करून या रस्त्याचा पाया रचला होता परंतु आता हा रस्ताच येथील पर्यटनासाठी अडचण ठरत असून सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमध्ये येथे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने पर्यटकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.पर्यायी मार्गाची माथेरान कर मागणी करत असताना त्यास दबावाखाली केराची टोपली दाखवली जात आहे.
दरवेळी सुट्ट्यांच्या हंगामात माथेरान दस्तुरी नाक्यावर आणि घाटरस्त्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेहमीच्या या वाहतूक कोंडीचा तिढा सोडविण्यासाठी माथेरानला सक्षम राजकीय इच्छाशक्तीची,आणि पर्यटन मंत्र्यांनी जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचे सर्वच स्तरातून बोलले जात आहे. शनिवारी आणि रविवारी माथेरानला पर्यटकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. नेरळ माथेरान हा एकमेव घाटरस्ता असल्याने आणि दस्तुरी वाहन पार्किंग मध्ये अपुरी पार्किंग व्यवस्था यामुळे पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मुंबई पुण्यापासून जवळचे ठिकाण असल्याने माथेरानला सर्वाधिक पसंती दिली जाते त्यामुळे इथे पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. प्रवासी कर आणि वाहन कराच्या माध्यमातून नगरपालिका आणि वनखात्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न प्राप्त होते.
परंतु येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक सेवासुविधा निर्माण करुन देण्यासाठी शासन स्तरावर आजमितीपर्यंत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.हे पर्यटनस्थळ विकसित व्हावे अशी कोणत्याही प्रकारची राजकीय पक्षांच्या नेत्यांची मुळात इच्छाशक्ती नसल्याने हे सुंदर पर्यटनस्थळ आजही मागासलेल्या अवस्थेत दिसत आहे. जग एकविसाव्या शतकात वाटचाल करत असताना इथे अद्यापही पर्यायी व्यवस्था निर्माण होऊ शकली नाही.जो पर्यटक आपल्या लहान मुलांना,वयोवृद्ध आई वडिलांना इथे फिरावयास घेऊन येतो त्यांना साधी वाहतुकीची सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही.ही राजकीय नेत्यांसाठी लाजिरवाणी बाब असल्याचे जेष्ठ मंडळी बोलत आहेत. केवळ मतांचे राजकारण करू पाहणाऱ्या नेत्यांनी निदान इथे येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.पण माथेरान हे गाव विकासापासून शापित आहेत की काय त्यामुळेच राजकीय नेते सुध्दा या गावाला आणि स्थानिकांच्या प्रश्नांना,समस्यांना नेहमीच दुय्यम स्थान देत आहेत असेही सूर उमटताना दिसत आहेत.
आम्ही माथेरानला नियमित येतो पण मागील महिन्यात स्वतःच्या वाहनाने येत असताना घाटात गाड्यांच्या प्रचंड गर्दीमुळे जवळपास दीड तास अडकून होतो.त्यानंतर हळूहळू दस्तुरी नाक्यावर आलो असता तिथेही तीच परिस्थिती निदर्शनास आली. आमची गाडी कुठे पार्क करावी हा प्रश्न निर्माण झाला. शेवटी नाईलाजाने आम्ही दस्तुरी नाक्यावरून पुन्हा घराकडे मार्गस्थ झालो. एकदिवसीय पिकनिक करण्याचाच बेत होता पण केवळ पार्किंग व्यवस्था नसल्याने माघारी जावे. लागल्यामुळे मुलांचा पुरता हिरमोड झाला.फरहाद बाटलीवाला, पर्यटक मुंबई