नेरळ : मोसमी पर्यटन बहरत असतानाच रविवारी प्रशासनाने बेशिस्तपणाला आवर घालण्यासाठी वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला खरा,पण त्याचा मोठा त्रास येथे पर्यटनासाठी आलेल्या सर्वसामान्य पर्यटकांना बसला.यामुळे या पर्यटकांची ही ससेहोलपट थांबणार तरी कधी अशी विचारणा आता होऊ लागली आहे.
माथेरानला पावसाळी पर्यटनासाठी दरवर्षी मोठी गर्दी होते.विशेष करुन विकेन्डला मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे दाखल होतात.मिनीट्रेन बंद असल्याने या पर्यटकांना खासगी वाहनाशिवाय पर्याय नसतो. रविवारीही माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना माघारी फिरताना वाहन मिळत नसल्याने अनेक यातना भोगाव्या लागल्या.नेरळ-माथेरान टॅक्सी चालक मालक सेवा संस्थेच्या टॅक्सी बंद केल्याने, पर्यटकांना साधारण पायी चालत 9 किलोमीटर अंतर हे जाण्याची वेळ आली होती. यात लहान मुले, जेष्ठ नागरीक आणि दिव्यांग व्यक्तींचे अक्षरशः हाल झाले.हे सर्व प्रशासनाच्या डोळ्यादेखत होत असताना प्रशासनाकडून कोणतीही पावले उचलली नाहीत त्यामुळे या प्रकाराला जबाबदार कोण ? असा प्रश्न स्थानिकांसह पर्यटक देखील विचारत आहेत.
काही वेळानंतर माहीत पडले की टॅक्सी या नेरळ पोलीस ठाण्यात उभ्या आहेत. लोकांना वाटले की नेरळ-माथेरान टॅक्सी चालक मालक सेवा संस्थेने संप पुकारला आहे का पण घडले याच्या विपरीत. टॅक्सी सुरू असताना नेरळ पोलिसांनी लाईन तोडून ओव्हरटेक करून वाहतूक कोंडी समस्याला कारणीभूत ठरत असलेल्या टॅक्सी चालकांच्या विरोधात धडक कारवाईला सुरुवात केली. तसेच वाहने पोलीस स्टेशन आवारात उभी केली. त्यामुळे संस्थेचे पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यात हमरीतुमरी झाली.
हा विषय स्थानिक आमदारापर्यंत गेला.आणि काही वेळाने या चिघळलेल्या विषयाला पूर्ण विराम मिळाला. तोवर पर्यटक हे पायी चालत नेरळच्या दिशेने निघाले होते. हातात आणि खांद्यावर सामानाची बॅग, एक हाताचे बोट धरून चालणारे लहान मुलं, यामुळे त्यांच्या चेहर्यावर तणावाचे दिसणारे विदारक समोर येणारे चित्र पाहाता घाट उताराचा रस्त्यावर पर्यटक हे घोळक्याने चालताना दिसत होते.
माथेरान हे पर्यटनावर अवलंबून आहे. हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे पर्यटकाना चांगली व दर्जेदार सेवा मिळावी म्हणून येथील प्रशासन झटत असायला पाहिजे. येथे आलेल्या पर्यटकाला कोणता त्रास होत आहे. त्यांना सोयी सुविधा मिळत आहे की नाही हे पाहणे महत्वाचे आहे. यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. पण यासाठी प्रशासकीय अधिकारी हे माथेरानमध्ये राहणे आवश्यक आहे. पण येथील प्रशासन कार्यालयातील एकही अधिकारी माथेरान मध्ये राहत नसल्याची खंत येथील स्थानिकांमध्ये आहे.
आम्ही माथेरान फिरण्यासाठी आलो पॉईंट खूप मस्त आहेत.पण येथे वाहन सुविधा नसल्याने खूप त्रास झाला.लहान मुले,म्हातारे लोक याना तर अतिशय त्रास झाला.वाहन युनियनचा काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही.खालपासून वर पर्यंत चालत यावे लागते आहे.येथील प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे.भाग्यश्री साळुंखे, पर्यटक माथेरान.
आपल्या सर्वांचा उदरनिर्वाह पर्यटकांमुळे चालतो.त्यामुळे त्यांना चांगली सेवा देणे आपले कर्तव्य असताना काही लोक पर्यटकांना वेठीस धरतात हे खूप चुकीचे आहे त्यामुळे माथेरान विषयी चुकीचा संदेश पसरतो त्यामुळे प्रत्येक विभागाने आपले कर्तव्य योग्य पद्धतीने बजावले तर माथेरान मध्ये सतत पर्यटकांची मांदियाळी दिसेल.दिनेश सुतार, माजी नगरसेवक