माथेरान ः मिलिंद कदम
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर माथेरान मधील राजकीय घडामोडींना वेग आला असून येथे लवकरच मोठा भूकंप होणार असल्याची राजकीय वर्तुळात बोलले जाते. यामुळे येथील राजकारणातील सर्व समीकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम आगामी नगरपालिका निवडणूक मध्ये सुद्धा दिसून येणार आहे.
राज्याप्रमाणे माथेरान मध्ये ही शिवसेना उबाठा गट व शिवसेना शिंदे गट यांच्या मधील वैर टोकाला पोहोचले होते . या दोन गटांमध्ये मारामारीचे पप्रकरणे ही माथेरानकरांना पहावयास मिळाले होते. त्यामुळे यांच्यामध्ये दिलजमाई होईल याची सूटभर ही शक्यता नव्हती परंतु माथेरानचे शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी व उबाठा गटाचे श्री प्रसाद सावंत यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून जवळीक वाढल्याने राजकीय लोकांच्या भुवया उंचावल्या असून हे दोन नेते माथेरान मधील नगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्र येण्याच्या दाट शक्यता निर्माण झाल्या आहेत ज्यामुळे येथील नगरपालिका निवडणुकी मधील समीकरणे नक्कीच बदलणार आहेत.
कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याबरोबर उघड बंड करण्याचे काम मागील काळामध्ये प्रसाद सावंत यांनी केले होते. त्यानंतर शिवसेनेमध्ये दोन भाग झाल्यानंतर कर्जत येथे प्रसाद सावंत यांच्यावर जीवघणा हल्ला झाला होता ज्याचे थेट आरोप कर्जत येथील काही आमदार समर्थकांवर प्रसाद सावंत यांनी केले होते. त्यामुळेच या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी समस्त कर्जतकरांनी अनुभवल्या होत्या परंतु मागील काही दिवसांमध्ये प्रसाद सावंत व आमदार महेंद्र थोरवे यांची गुप्त ठिकाणी भेट झाल्यानंतर एकत्र येण्याचे संकेत मिळाले आहे त्यामुळे राजकारणामध्ये कोणीही कोणाचा कायमस्वरूपी शत्रू व मित्र नसतो हे पुन्हा एकदा माथेरानच्या राजकारणामध्ये उघड झाले असून त्याचा शिवसेनेला फायदा होतो की नुकसान हे येणारा काळच ठरविणार आहे कारण प्रसाद सावंत यांची साथ सोडून अनेक जण चंद्रकांत चौधरी गटामध्ये सामील झाले होते.
प्रसाद सावंत यांच्या विचारसरणीचे या लोकांना जमले नसल्याने त्यांनी थेट पक्ष बदल केला होता अशा लोकांची आता कोंडी होणार असून ते काय भूमिका घेतात यावर पुढील राजकारण ठरणार आहे त्याचप्रमाणे काँग्रेस मधून शिवसेनेमध्ये दाखल झालेले श्री मनोज खेडकर व नगरसेवक शिवाजी शिंदे हे नेहमीच प्रसाद सावंत यांचे विरोधक म्हणून माथेरान करांनी पाहिले आहेत व तेही शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते असल्याने ते सुद्धा यामुळे दुखावले गेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही मग त्यांनी यावेळी पक्ष सोडला तर हा शिंदे गटाला मोठा धक्का बसणार आहे.
भाजपाने नगराध्यक्ष आमचाच ही भूमिका आधीच जाहीर केल्याने यावेळी दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी विरोधात भाजपा असा सामना राहणार का ही चर्चा सध्या सर्वत्र होत आहे कारण भाजपाने मागील एक वर्षांमध्ये माथेरानच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घातला असून हे प्रश्न मार्गी लावण्याचा करिता थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गाठीभेटी केल्या आहेत व अनेक प्रश्न आता अंतिम टप्प्यात असल्याने भाजपालाही निवडणुकीमध्ये बळ आले आहे.
या सर्व घडामोडींमध्ये माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे राष्ट्रवादी हा येथल महत्त्वाचा पक्ष आहे व विधानसभा निवडणुकीमध्ये महेंद्र थोरवे यांच्या विरोधात पक्षाचे नेते सुधाकर घारे यांनी निवडणूक लढवली होती त्यामुळे त्यांच्याशी सुद्धा युती होणार का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण सुनील तटकरे यांच्या विरोधात सातत्याने थोरवे यांची विधाने गाजत असतात त्यामुळे तेही या नवीन समीकरणासमती देतील अशी शक्यता कमीच आहे,
नगराध्यक्षपदासाठी लॉबिंग
अजून निवडणुकांना खूप वेळ असल्याने नवीन समीकरणे नक्कीच जुळणार आणहे. या सर्व प्रकारात भाजप पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे . कारण मनोज खेडकर यांनी शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश करताना आमदार महेंद्र थोरवे यांनी आमच्या पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री मनोज खेडकर असतील असे सांगितले होते. परंतु आता शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनीही आपण ही निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी लढविणार असल्याचे खाजगीत बोलून दाखवले आहे. त्यामुळे पक्षांतर्गत वादही उफाळून येणार आहेत.