माथेरान ः मिलिंद कदम
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना सुध्दा अद्यापही मुख्य मार्गावरील काही ठिकाणी खड्डेमय रस्ते झाले आहेत. त्यांची साधी डागडुजी सुध्दा केलेली नसल्याने याच खड्डेमय रस्त्यातून गणपती बाप्पाला धक्के झेलत प्रवास करावा लागणार असल्यामुळे गणेशभक्तांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे.
दस्तुरी नाक्यापासून ते लायब्ररी पर्यंत सद्यस्थितीत क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविण्यात आले आहेत. परंतु त्यावेळी या रस्त्यांची कामे करताना अत्यंत घाईगडबडीत पूर्ण केल्यामुळे बहुतांश भागातील निकृष्ठ क्ले पेव्हर ब्लॉकच्या जागी खड्डे पडले आहेत. याच मार्गावरून स. 6 वा.पासून ते रात्री उशिरा दहा वाजेपर्यंत ई रिक्षासह, घोडे, हातरीक्षा, पर्यटकांची मोठया प्रमाणात रहदारी सुरू असते.इंदिरा गांधी नगर या भागातील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर जागोजागी खड्डे पडले आहेत. यातून मार्ग काढताना खूपच त्रासदायक बनलेले असून प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे.
विशेष म्हणजे बहुतेक सर्वच अधिकारी वर्ग याच ई रिक्षाच्या सेवेचा मनसोक्तपणे लाभ घेताना दिसून येत आहेत.ई रिक्षाची सुविधा उपलब्ध झाल्यापासून जवळपास बहुतेक मंडळी यामध्ये अगोदर पासूनच ज्यांचा ई रिक्षा सुरू होण्यासाठी प्रखर विरोध होता आणि आजही कायम विरोध आहे अशी मंडळी या सेवेचा लाभ घेण्यासाठी अग्रेसर दिसत आहेत. कमी रिक्षा असल्यामुळे प्रवाशांना बर्याचदा ताटकळत उभे राहावे लागते परंतु कोणत्याही खात्याचा एखादा अधिकारी ई रिक्षाच्या स्टँडवर आला की सर्वात अगोदर त्यांना बसविले जाते आणि थेट त्यांच्या कार्यालयापर्यंत मोफत सेवा देण्यात येते यावरून अनेकदा पर्यटकांचे वाद होताना दिसत आहेत.
सहा महिन्यांच्या पायलट प्रोजेक्ट मध्येच अधिकार्यांना मोफत सुविधा देण्यात यावी असे नमूद केले होते परंतु ई रिक्षाच्या सेवेला एक वर्ष पूर्ण होऊन सुध्दा बहुतांश अधिकारी, कर्मचारी सहकुटुंब या सेवेचा ऑफिसपर्यंत मोफत लाभ घेत असून ही मोफत सुविधा बंद करण्यात यावीत. हिल स्टेशन म्हणून नावारूपाला आलेल्या या ठिकाणी उत्तम दर्जाचे रस्ते नाहीत ही विदारक दृश्ये माथेरानच्या प्रतिमेला धोका निर्माण करणार असल्याचे सुध्दा जागरूक नागरिकांमधून बोलले जात आहे.
माथेरान न.प.च्या वतीने सेंट्रल हॉटेल ते टपालपेटी नाका या मुख्य मार्गांवरील खड्डे बुजविण्यात आले. परंतु टपालपेटी नाका ते पशुवैद्यकीय दवाखाना या मार्गांवर असलेल्या खड्डयामुळे हातरीक्षा चालक, अश्वचालक, ई-रिक्षा चालक तसेच पर्यटक, नागरिकांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे त्यातच चार दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या कालावधीत ई-रिक्षातून श्रीगणेश मूर्ती आणण्यास गणेशभक्तांना खूप त्रास सहन करावा लागणार असून खड्डयांमुळे ई-रिक्षातून श्रीगणेश मूर्ती आणताना खड्ड्यामुळे श्रीगणेश मूर्तिचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही याचा न.प.च्या संबंधित विभागाने विचार करून लवकरात लवकर सदरच्या मार्गांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश द्यावेत जेणेकरून गणेशभक्त, पर्यटक व नागरिकांना या मार्गांवरून प्रवास करताना व ई-रिक्षातून श्रीगणेशमूर्ती आणण्यास अत्यंत सोयीचे होईल.चंद्रकांत जाधव, माजी उपनगराध्यक्ष, माथेरान