Matheran Neral Ghat Road Pudhari
रायगड

Matheran Neral Ghat Road: ‘माथेरान सफर’ ठरतेय जीवघेणी; नेरळ-माथेरान घाटरस्ता खड्ड्यांच्या विळख्यात

पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

नेरळ: माथेरानच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटकांची पावले दररोज माथेरानकडे वळत असताना, दुसरीकडे माथेरानचा प्रमुख प्रवेशमार्ग असलेल्या नेरळ–माथेरान घाटरस्त्याची अवस्था मात्र दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

मुसळधार पावसामुळे घाटरस्त्यावरील अनेक ठिकाणचे डांबरीकरण अक्षरशः वाहून गेले असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. उघडे पडलेले दगड, खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी आणि निसरडा रस्ता यामुळे वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. ‘माथेरान सफर’ आता खड्ड्यांमुळे जीवघेणी ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.

माथेरानला जाण्यासाठी नेरळ–माथेरान घाटरस्ता हा प्रमुख आणि एकमेव मार्ग असल्याने या रस्त्यावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. विशेषतः शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांच्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. पावसाळ्यात माथेरानचे हिरवेगार डोंगर, धबधबे आणि धुक्याने व्यापलेले वातावरण अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असल्याने घाटरस्त्यावर वाहतुकीचा ताणही वाढतो.

अशा वेळी रस्त्याची झालेली दुरवस्था वाहनचालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. घाटातील तीव्र वळणे, अरुंद रस्ता आणि त्यात पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देतानाही चालकांची अक्षरशः कसरत होत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहने अचानक दुसऱ्या बाजूला वळत असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याची शक्यताही वाढली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात माथेरान परिसरात झालेल्या मुसळधार पावसाचा नेरळ–माथेरान घाटरस्त्याला मोठा फटका बसला आहे. पावसाचे पाणी वेगाने वाहून गेल्याने अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण उखडले आहे. काही ठिकाणी डांबरासोबत रस्त्यावरील खडी आणि दगडही वाहून गेल्याने रस्त्याचा पृष्ठभाग पूर्णपणे खराब झाला आहे.

पावसाच्या पाण्याने भरलेले खड्डे वाहनचालकांना सहज दिसत नसल्याने विशेषतः दुचाकीस्वारांसाठी परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. वेगाने येणाऱ्या दुचाकीचा चाक अचानक खड्ड्यात गेल्यास वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे किरकोळ घसरणीपासून गंभीर अपघातापर्यंतची शक्यता निर्माण झाली आहे.

वॉटर पाईप परिसरात धोक्याची घंटा

नेरळ-माथेरान घाटरस्त्यात चार ठिकाणी मिनी ट्रेनची मार्गिका रस्ता ओलांडते. त्यापैकी वॉटर पाईप परिसरातील तीन ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. डांबर आणि दगड वाहून गेल्याने मिनी ट्रेनच्या रुळांलगतचा रस्ता उखडला असून, या ठिकाणी दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे.

रस्त्याची पातळी खालावल्याने काही ठिकाणी दुचाकींची चाके मिनी ट्रेनच्या रुळांमध्ये अडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. रुळांवरून सुरक्षितपणे वाहन नेताना चालकांचे लक्ष पूर्णपणे रस्त्याच्या अवस्थेकडे केंद्रित करावे लागत असल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT