माथेरान (रायगड) : मिलिंद कदम
माथेरानमध्ये नगरपालिका निवडणुकांचा ज्वर हळूहळू चढू लागला असून जनतेमधून नगराध्यक्षाची निवड असल्याने नगर सेवक पदासाठी महत्त्व कमी झाल्या असून कोण बनणार नगराध्यक्ष यांच्या चर्चा आता घरोघरी रंगू लागली आहे. यामध्ये प्रस्थापित राजकीय पक्षांना या निवडणुकीमध्ये धक्का बसण्याची शक्यता अधिक वाढवली जात आहे.
नगरपालिका निवडणूक म्हणजे आर्थिक घोडा बाजार हे समीकरण आता झाले असून मतदारांच्याही अंगवळणी पडू लागले आहे कारण नगरपालिकेमध्ये मतदार ही मतदान करताना आर्थिक फायदा बघत असल्याच्या घटना मागील काही निवडणुकांमधून दिसून आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती घेतली असता नगरपालिकेमध्ये जाणारे बहुतांश प्रतिनिधी वैयक्तिक फायद्यासाठी कोणतीही तडजोड करण्यासाठी तत्पर असल्याने मतदारांमध्ये हे नगरसेवक निवडून देण्याबाबत जास्त सारस्व नसल्याचे दिसून आले आहे परंतु नगराध्यक्ष पदासाठी मात्र योग्य उमेदवार असावा यासाठी सर्वजण आग्रही आहेत. त्यामुळेच माथेरानमधील या वेळची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कोणाला मिळणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गटासह इतर पक्षांतील इच्छुकांनी तयारी सुरू केली असल्याचे बोलले जाते.
यापुढे उमेदवारी जाहीर करताना पक्ष फुटणार नाही याचीही काळजी वरिष्ठांना घ्यावी लागणार आहे, भाजपाने मागील पाच वर्षापासून नगराध्यक्ष आमचाच असा नारा दिला असला तरीही प्रबळ दावेदार म्हणून कोणीही समोर येत नसल्याने नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून ते जवळपास बाद झाले असे सांगितले जात आहे.
या पदासाठी खऱ्या घडामोडी या तीन उमेदवारांमध्येच घडणार असल्याने सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे कारण कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरान नगरपालिका हा प्रश्न गांभीयनि घेतला आहे. कोण उमेदवार या वेळेला समोर येईल हे दोन दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे कारण अनेकांनी छुप्या पद्धतीने या पदासाठी आपली इच्छा व्यक्त केली आहे तर माथेरान बाहेर सर्वच पक्ष एकमेकांशी संधान बांधून असून गुपचूप रात्रीस खेळ चाले अशा पद्धतीने मीटिंग होत असल्याने मतदार हे संभ्रमात आहे. कोणत्याही पक्षाला मात्र बहुमत नसल्याने एकमेकांचे साथ घेणे गरजेचे आहे परंतु वैयक्तिक हेवेदावे सातत्याने समोर येत असल्याने यामध्ये अडचण ठरत आहे. चाणक्य नीतिचा वापर करून इच्छुक उमेदवारांच्या प्रतिमा डागळण्याचे काम हे छुप्या पद्धतीने होत असल्याचे नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाही पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढविणार असल्याचे सांगितल्याने ही निवडणूक सरळ नसणार हे स्पष्ट झाले असून साम, दाम, दंड, भेद अशा प्रकारचा वापर यावेळी पहिल्यांदाच माथेरान निवडणुकीमध्ये होणार हे आता निश्चित झाले आहे.
दिवाळी पर्यटन हंगाम आता संपुष्टात आल्यामुळे निवडणूक हालचालींना आता वेग येणार असून लवकरच स्पष्ट चित्र नागरिकांसमोर येईल. परंतु सध्याच्या घडामोडी पाहता येथील राजकीय पटलावरील वातावरण सध्या गरम असून फोडाफोडीच्या राजकारणाला अधिक प्राधान्य दिले गेल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ता या सर्व प्रक्रियेपासून लांब असून मागील पाच सात वर्षांमध्ये त्यांच्याबरोबर झालेल्या गोष्टींचा हिशोब चुकता करण्याकरता हे सर्व तयार असल्याचे एका कार्यकर्त्यांनी सांगितले. दरम्यान, रायगड जिल्ह्यातर इतर नगरपालिकामधील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसते.
वैयक्तिक हेवेदावे
कोणत्याही पक्षाला मात्र बहुमत नसल्याने एकमेकांचे साथ घेणे गरजेचे आहे परंतु वैयक्तिक हेवेदावे सातत्याने समोर येत असल्याने यामध्ये अडचण ठरत आहे.