Matheran Municipal Chief Controversy Pudhari
रायगड

Matheran Municipal Chief Controversy: प्रलंबित नागरी समस्या सुटत नसल्याने माथेरानकरांमध्ये तीव्र नाराजी

मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर वारंवार प्रश्नचिन्ह; नियोजनशून्य कामे होत असल्याचा नगरसेवकांचा ओराप

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कदम

माथेरान: माथेरान नगरपालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे व पालिका कर्मचारी स्थानिकांच्या समस्या सोडविण्यास असमर्थ ठरत असून जनतेने निवडून दिलेल्या नगरसेवकांना ही जुमानत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण असून सत्ताधारी नगरसेवकांबरोबरच विरोधकही त्यांच्या कार्यप्रणालीवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.

विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अविश्वास ठराव दाखल करण्याची मागणी केली असून त्यास सर्व विरोधी नगरसेवकांचा पाठिंबा असेल असे विरोधी नगरसेवक सचिन दाभेकर यांनी स्पष्ट केले आहे.

माथेरान नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर येथील प्रशासकीय राजवट संपुष्टात आली होती. सभागृहामध्ये आलेल्या नगरसेवकांनी प्रशासकीय राजवटीतील कामे नियमबाह्य झाल्याचे निदर्शनास आले त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर वारंवार शंका उपस्थित केल्य गेल्या.

माथेरानला पाणीपुरवठा करणारा शार्लेट लेक तलाव स्वच्छता ठेकेदारी, मलनिस्सारण प्रकल्प, येथील अंतर्गत रस्ते, ३८ लाख ७० हजार रुपये प्रत्येकी एक या किमतींची १० शौचालय, आरओ प्लांट, डस्टबीन खरेदी, प्लास्टिक बंदीचा उडालेला फज्जा याबाबत माहिती उपलब्ध होत नसल्याने नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

माथेरानमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे व येथील विविध विभागांमध्ये रस्त्यावर बसविलेले पेवर ब्लॉक यांच्यावर शेवाळ साचून अनेक जण घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. वारंवार तक्रार दाखल करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

काही लोकांना झुकते माफ देण्याचे काम पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. यावर तीव्र नाराजी स्थानिक नागरिक बोलून दाखवत आहेत. संत रोहिदास नगर या विभागात नगरसेवक सचिन दाभेकर यांनी स्वखर्चाने ब्लिचिंग पावडर टाकून या रस्त्यांची स्वच्छता केली.

माथेरान नगरपालिका ही येथील पर्यटन पूरक प्रकल्प राबविण्यामध्ये सपशेल अपयशी ठरली असून स्वहिताचे प्रकल्प राबवून झोळी भरण्याचे काम सुरू असून सत्ताधारी नगरसेवकांनी कर्मचारी वर्ग जुमानत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे.

प्रशासकीय काळापासून माथेरान नगरपालिकेमध्ये अनेक आर्थिक व्यवहार झाले असून हे सर्व व्यवहार आक्षेपार्थ राहिले आहेत. ज्याच्या बाबत आम्ही वारंवार तक्रार करूनही त्यास न्याय मिळत नसून माथेरानचे मुख्याधिकारी या सर्व व्यवहारांमध्ये केंद्रस्थानी असल्याचे सत्ताधारी वारंवार बोलून दाखवत आहे.

परंतु आजमितीपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मागील काही महिन्यानपासून आम्ही मला निसारण प्रकल्प, ई-टॉयलेट, खत मशीन, लेक, माथेरानचे रस्ते दस्तुरी नाका प्रवेशद्वारे येथे नियोजनाचा अभाव व प्लास्टिक बंदीचा उडालेला फज्जा याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहे.

परंतु नगरपालिका अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत असून सत्ताधारी नगरसेवकांनाही जुमानत नाहीत तश्या बातम्याही प्रसारित झाल्या आहेत. तसेच वारंवार सूचना करून सुद्धा प्रशासना मार्फत नगरसेवकांची कामे होत नाही. प्रशासना मार्फत नियोजन शून्य व निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत असा आरोप नगरसेवकांकडून करण्यात येत आहे.

मागील विशेष सर्वसाधारण सभेत पिण्याच्या पाण्याविषई मुख्याधिकारी यांना सूचना केल्या होत्या परंतु जनतेला गढूळ पाणी पाजल्या नंतरच जंतूनाशके वाटण्यात आली. सर्वत्र रस्ते शेवाळमय झाले असताना सूचना करून सुद्धा ब्लिचिंग मारण्यात येत नाही. मुख्याधिकारी यांचे ऑफिस दुपारी २ वा. नंतर सुरु होते. सात महिन्यामध्ये फक्त तीन सभा, सभेत झालेले ठराव मिळत नाहीत, झालेले विषय ठरावात येत नाही. अश्याप्रकारे माथेरांचा विकास कसा होणार? अश्या या मुख्याधिकारी यांच्यावर अविश्वास ठराव का घेऊ नये? तसेच सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव घेतल्यास आम्ही विरोधकही त्यास पाठिंबा देऊ.
- सचिन दाभेकर, नगरसेवक, शिवसेना पक्ष (ठाकरे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT