Matheran Mini Train Stamp Pudhari
रायगड

Matheran Mini Train Stamp: मिनिट्रेनच्या स्टॅम्पने केरळवासीयांची जिंकली मने; चार महिन्यांत ९,५०० पोस्टकार्ड, ९०० आंतरदेशीय पत्र विक्री

माथेरान पर्यटनाची केरळमध्ये पोस्टाद्वारे जाहिरात

पुढारी वृत्तसेवा

नेरळ: माथेरानच्या सुप्रसिद्ध मिनिट्रेनची मोहिनी केवळ पर्यटनस्थळापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तिच्या आकर्षक स्टॅम्पने केरळमधील पर्यटकांचीही मने जिंकली आहेत. माथेरानच्या डाकघरात मिनिट्रेनच्या वाफेच्या इंजिनाचा स्टॅम्प असलेल्या पोस्टकार्ड आणि आंतरदेशीय पत्रांची मागील चार महिन्यांत विक्रमी विक्री झाली आहे. मे ते ८ सप्टेंबर या कालावधीत तब्बल ९,५०० पोस्टकार्ड आणि ९०० आंतरदेशीय पत्रांची विक्री झाल्याची माहिती पोस्ट कार्यालयाकडून देण्यात आली.

माथेरान हे देशभरातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. गुजरातसह विविध राज्यांतून येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात केरळमधून आलेल्या पर्यटकांची संख्या विशेष लक्षवेधी ठरली. या पर्यटकांनी माथेरानच्या पोस्ट कार्यालयात जाऊन मिनिट्रेनचा स्टॅम्प असलेली पोस्टकार्ड आणि आंतरदेशीय पत्रे खरेदी करून ती आपल्या केरळमधील मित्र, नातेवाईक आणि आप्तेष्टांना पाठवली.

माथेरान पोस्ट कार्यालयात उपलब्ध असलेल्या प्रत्येक पोस्टकार्ड किंवा आंतरदेशीय पत्रावर मिनिट्रेनच्या वाफेच्या इंजिनाचा विशेष स्टॅम्प मारला जातो. त्यावर कार्यालयाची तारीखही नमूद केली जाते. या वैशिष्ट्यपूर्ण स्टॅम्पमुळे पर्यटकांना माथेरानच्या आठवणी जपण्याची अनोखी संधी मिळत आहे.

विशेष म्हणजे इंटरनेट, ई-मेल, व्हॉट्सॲप आणि व्हिडिओ कॉलच्या आधुनिक युगातही केरळमधील पर्यटकांनी पारंपरिक पोस्टकार्डचा वापर करून संदेश पाठवण्याला पसंती दिली. मिनिट्रेनच्या स्टॅम्पचे आकर्षण इतके प्रभावी ठरले की, अनेक पर्यटकांनी माथेरानच्या भेटीचा अनुभव आपल्या परिचितांपर्यंत पोस्टाद्वारे पोहोचवला. त्यामुळे केरळमध्ये माथेरानच्या पर्यटनाची एक आगळीवेगळी जाहिरात होत असल्याचे चित्र आहे.

माथेरानमध्ये आलेल्या केरळमधील पर्यटकांनी मे महिन्यापासून पोस्टकार्ड खरेदीला सुरुवात केली. सुरुवातीला विक्रीचे प्रमाण कमी होते; मात्र जुलै महिन्यापासून केरळमधून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने पोस्टकार्ड आणि आंतरदेशीय पत्रांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. चार महिन्यांत झालेली विक्रमी विक्री ही माथेरानच्या पोस्ट कार्यालयासाठी विशेष उल्लेखनीय बाब ठरली आहे.

सप्टेंबरपासून पर्यटकांची संख्या कमी झाल्याने पोस्टकार्डची विक्रीही घटली आहे.माथेरानमध्ये आलेल्या केरळमधील पर्यटकांनी मे महिन्यापासून पोस्टकार्ड खरेदी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला विक्री कमी होती; मात्र जुलैपासून पर्यटकांचा ओघ वाढला. चार महिन्यांत ९,५०० पोस्टकार्ड आणि ९०० आंतरदेशीय पत्रांची विक्री झाली. आता पर्यटकांची संख्या कमी झाल्याने विक्रीचे प्रमाणही घटले आहे. केरळच्या पर्यटकांमुळे पर्यटनवृद्धीला नवा आयाम मिळाला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात माथेरानमध्ये केरळमधील पर्यटक मोठ्या संख्येने दिसून आले. त्यांनी गुजरातमधून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येलाही मागे टाकल्याचे निरीक्षण आहे. पोस्ट कार्यालयात मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याचे पाहून चौकशी केली असता ते मिनिट्रेनच्या इंजिनाचा स्टॅम्प असलेली पोस्टकार्ड पाठवत असल्याचे समोर आले. मिनिट्रेनच्या या वैशिष्ट्यपूर्ण स्टॅम्पमुळे माथेरानच्या पर्यटनाला राज्याबाहेर नवी ओळख मिळत असून, पारंपरिक पोस्टसेवेच्या माध्यमातून पर्यटनवृद्धीचा हा अनोखा प्रयोग ठरत आहे.
- विरप्पा नरुटे, पोस्टमास्तर, माथेरान पोस्ट कार्यालय
यावर्षी केरळमधील पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरानमध्ये आले होते. विशेषतः पावसाळ्यात त्यांचे प्रमाण वाढले. पोस्टकार्डवरील मिनिट्रेनच्या स्टॅम्पचे आकर्षण पाहून ते आपल्या नातेवाईकांना पत्रे पाठवत असल्याचे लक्षात आले. माथेरानच्या पर्यटनवृद्धीसाठी ही अभिमानाची बाब आहे.
- चंद्रकांत जाधव, माजी उपनगराध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT