गिरिस्थान माथेरानची चाके उद्यापासून थांबणार  pudhari photo
रायगड

Matheran rickshaw strike : गिरिस्थान माथेरानची चाके उद्यापासून थांबणार

हातरिक्षांसह ई-रिक्षाचालकांचा उद्यापासून बेमदुत बंद, प्रवाशांसह नागरिकांची होणार गैरसोय

पुढारी वृत्तसेवा

माथेरान ः मिलिंद कदम

माथेरान मधील हात रिक्षा व ई रिक्षा चालकांनी ई रिक्षामध्ये वाढ व्हावी या करता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा महिने वाट पाहिल्यानंतर आता शेवटचे हत्यार म्हणून सरसकट सर्व रिक्षा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार हात रिक्षा व ई रिक्षा 10 तारखेपासून बेमुदत बंद करण्यात येणार असल्याचे रिक्षा संघटनेने जाहीर केले आहे.

माथेरानमध्ये 94 परवाना धारक हात रिक्षा आहेत , ज्यापूर्वीपासून येथे चालत आहेत, पूर्वी अशिक्षित व बेरोजगार स्थानिक या रिक्षा खेचण्याचे काम करत असतात त्यावेळी रोजगारी कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने हाच रिक्षा व्यवसाय तेजीत होता. कालांतराने ही सर्व मंडळी वयस्कर झालेत व त्यांची पुढील पिढी शिक्षित झाल्याने या व्यवसायाकडे फार कमी लोक उपलब्ध होत होती त्यामुळेच या शिक्षित तरुणांना रिक्षा खेचण्याचा हा व्यवसाय गुलामगिरी प्रमाणे वाटू लागला होता.

त्याकरिता सन्मान जनक व्यवसाय मिळावा म्हणून रिक्षा संघटनेने न्यायालयामध्ये धाव घेत पर्यावरण पूरक ई रिक्षा उपलब्ध व्हाव्यात याकरिता दाद मागितली प्रदीर्घ न्यायालयीन लढा लढल्यानंतर न्यायालयाने ई रिक्षा साठी सकारात्मक निकाल देताना प्रायोगिक तत्त्वावर सात रिक्षा सुरू करण्यास राज्य शासनाला सुचविले. या सात रिक्षा शासनामार्फत वर्षभर चालविण्यात आल्या. त्याचा अहवाल सकारात्मक दिल्यानंतर 94 रिक्षा मालकांपैकी 20 जणांची लकी ड्रॉ काढून निवड करत वीस रिक्षा सुरू करण्यात आल्या. त्याला आता एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे.

बाकीच्या 74 रिक्षा चालकांवर हा अन्याय झाल्याने त्यांनीही अनेक वेळा विद्रोही भूमिका मांडली होती परंतु हा निर्णय न्यायालयाकडे असल्याने संघटनेचे हात बांधले होते.परंतु माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निर्णय घेताना सहा महिन्यांमध्ये सर्व सोपस्कार पूर्ण करत राज्य शासनाने गरजू लोकांना व या 74 रिक्षा चालकांना ई-रिक्षा उपलब्ध करून द्याव्यात असा निर्णय जाहीर केला होता. त्याची मुदत संपल्यानंतरही यावर कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही.

यामुळेच रिक्षा संघटनेमध्ये खळबळ माजली होती अनेक जणांना शासन जाणून बुजून आपल्याला डावलत असल्याची भावनेतून असुरक्षितता निर्माण झाली आहे व त्यातून आता न्याय मिळेपर्यंत रिक्षा बंद हा शेवटचा लढा देण्यास संघटना तयार झाली आहे. या काळात हात रिक्षा व ई रिक्षा बंद असणार आहेत त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पर्यटक व रुग्णांची गैरसोय होणार आहे.

रिक्षा बंद आंदोलन जाहीर करून आठ दिवसाचा कालावधी लोटला असून अजून पर्यंत कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी संघटनेशी संपर्क साधला नसून यातूनच अधिकाऱ्यांची मानसिकता दिसून येत आहे परंतु आता न्यायासाठी ही लढाई आम्ही एकजुटीने लढणार
शकील पटेल अध्यक्ष, रिक्षा चालक मालक संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT