मिलिंद कदम
माथेरान: ब्रिटीशकालीन जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील माथेरान गिरीस्थान या थंड हवेच्या ठिकाणाला जोडणारा 'नेरळ-माथेरान घाट रस्ता' पर्यटकांसह स्थानिकांसाठी एकमेव जीवनवाहिनी आहे. मात्र, सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अत्यंत बेजबाबदार आणि निष्क्रिय कारभारामुळे हा संपूर्ण घाट रस्ता प्रवाशांच्या जीवावर उठला आहे. घाटातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या 'जुम्मा पट्टी' येथील तीव्र वळणाचा 'एस टर्न' सध्या खऱ्या अर्थाने 'मृत्यूचा सापळा' बनला आहे. येथे कधीही मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
या घाट रस्त्यावरून प्रवास करताना अनेक तीव्र चढ-उतारांना सामोरे जावे लागते. जुम्मा पट्टी येथील धोकादायक वळणावर वाहनांचा ताबा सुटून अपघात हाेऊ नये म्हणून सुरक्षा रेलिंग (कठडे) बसवण्यात आले होते. मात्र, मागील काही अपघातांमध्ये येथील रेलिंग पूर्णपणे तुटून गेले आहेत. येथील लोखंडी सुरक्षा रेलिंग अक्षरशः दुमडून जमिनीवर पडले आहेत आणि दरीची बाजू पूर्णपणे उघडी पडली आहे. नवीन वाहन चालकांना या धोकादायक वळणाचा अंदाज येत नाही. तीव्र चढावर वाहने अचानक पाठीमागे येण्याच्या घटना घडतात. मात्र, अशी वाहने मागे आल्यास त्यांना रोखण्यासाठी कोणतीही सुरक्षा भिंत किंवा रेलिंग शिल्लक राहिलेली नाही. ही तुटलेली रेलिंग्ज दुरुस्त करण्याचे साधे सौजन्य सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखवलेले नाही.
कोट्यवधींचा निधी खर्च, तरीही रस्त्यांची चाळण!
या महत्त्वाच्या पर्यटन मार्गाच्या डागडुजीसाठी आणि सुरक्षेसाठी शासनाकडून मोठा निधी मंजूर केला गेला आहे. मात्र, हा निधी नेमका कुठे खर्च झाला? असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. मागील काही काळापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे संपूर्ण घाटमार्गात ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्याने अवघड वळणांवरून वाहने संथ गतीने जातात; परिणामी ती बंद पडून मागे येण्याच्या घटना घडतात. मागील वर्षात याच वळणावर सर्वाधिक अपघात झाले, तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही.
स्थानिक नागरिक आणि पर्यटकांची प्रमुख मागणी
घाटातील हा सर्वात कठीण आणि धोकादायक ठरलेला चढ-उताराचा रस्ता तातडीने अधिक रुंद करण्यात यावा आणि येथील तीव्र चढ कमी करण्यात यावा, अशी मागणी माथेरानमधील स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. तसेच, येथे तातडीने मजबूत आणि नवीन सुरक्षा कठडे बसवणे अत्यंत गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या ढिम्म आणि निष्क्रिय कारभारामुळे पर्यटकांनी आपल्या जीवाची जोखीम पत्करून माथेरानला यायचे का? एखाद्या मोठ्या अपघातात निष्पाप प्रवाशांचा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? स्थानिक जनतेतून आता या बेजबाबदार अधिकाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, तत्काळ दुरुस्ती न झाल्यास स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिला जात आहे.