महावितरण अधिकार्‍यांचा कामचुकारपणा; माथेरानकर हैराण (File Photo)
रायगड

Electricity billing problem : महावितरण अधिकार्‍यांचा कामचुकारपणा; माथेरानकर हैराण

माथेरानमधील ग्राहकांना बसतोय आर्थिक भुर्दंड

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : आनंद सकपाळ

माथेरानमध्ये वीज बिल देयक तारखेनंतर दिली जात असल्याने त्याचा आर्थिक भुर्दंड समस्त माथेरानमधील ग्राहकांना बसत आहे. माथेरान येथील महावितरण अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचा कामचुकारपणाचा भुर्दंड आम्हाला कशाला? असा प्रश्न माथेरानमधील वीजग्राहक यांच्या कडून उपस्थित केला जात आहे.

माथेरान मध्ये चौदाशे पेक्षा जास्त वीज ग्राहक आहेत. वीज बिल भरणा प्रत्येक महिन्याची तारीख 2 असते, पण या अगोदर वीज बिल न देता 2 तारखेनंतर दिली जातात असं येथील ग्राहकाचे म्हणणे आहे. जर 2 तारखेनंतर वीज बिल भरले तर दहा रुपये त्याला उशिरा बिल भरल्यामुळे दंड भरावा लागतो. काहींना तर स्लॅब नुसार ज्यादा बील आले तर दंड जास्त लागतो.

याबाबत विचारणा करण्यासाठी महावितरण माथेरान कार्यालयात गेले असता त्याठिकाणी ना अधिकारी ना कर्मचारी मग याबाबत जाब विचारणार कोणाला ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या आधी महावितरणला ताळ्यावर आणण्यासाठी मनसे कडून आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी एक महिन्यात माथेरान वीज ग्राहकांच्या समस्या सोडविल्या जातील असे महावितरण कडून सांगण्यात आले. त्याप्रसंगी मनसे अध्यक्ष संतोष कदम आणि वीज ग्राहक नुरमहम्मद शेख यांनी वीज बिल उशिरा मिळत असल्याचे अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

हा प्रश्न मार्गी लावला जाईल असे सांगण्यात आले. पण अजूनही त्यावर महावितरणकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.अजूनही ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. चौदाशे ग्राहकांचे चौदा हजार रुपये पेक्षा जास्त महावितरणला अधिक मिळत आहेत. ते फक्त अधिकार्‍यांच्या कामचुकार पणामुळे असे ग्राहकांकडून बोलले जात आहे. मीटर रिडींग घ्यायला ठेकेदारी पद्धतीवर कर्मचारी नेमले असून ते कधी येतात हे कळतच नाही. मीटर रीडिंगचे फोटो घेतात मग बिलावर तो फोटो का छापत नाहीत? असा प्रश्न ग्राहकांकडून विचारला जातोय. त्यामुळे सरासरी बिल येत असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत मनसेकडून आंदोलन तीव्र करण्याचे सूतोवाच मिळत आहेत. ऑनलाइन बिल जरी मिळत असेल तरी काही परिवार असे आहेत की त्यांच्याकडे स्मार्ट फोन नाहीत.हातावर पोट असल्यामुळे इतका खर्चिक फोन घेणं त्यांना न परवडणारे आहे तसेच ऑनलाइन बिल भरण्यासाठी नेटवर्क सुद्धा मिळत नसल्याने ग्राहकांची पंचाईत होते.ऑफलाईन वीज बिल भरणा हे शेवटच्या तारखेला घेत असल्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत महावितरणचे म्हणणे ऐकण्यासाठी कार्यालयात गेलो असता कोणीही अधिकारी उपस्थित नव्हता.

मागील काही महिन्यांपासून वीज बिल ही मुदत तारखेच्या नंतर मिळत आहेत.त्यामुळे आम्हाला ज्यादा रुपये मोजावे लागत आहे.महावितरणच्या अधिकार्यांनी मुदतीच्या आत बिल दिले तर आम्हाला आर्थिक भुर्दंड बसणार नाही असे आम्ही वारंवार सांगत आलोय पण अधिकारी याकडे कानाडोळा करतात.अधिकार्‍यांच्या कामचुकार पणाचा दंड आम्ही का भरावा?
नूरमोहम्मद शेख, माथेरान वीज बिल ग्राहक
माथेरान मध्ये वीज समस्या जटिल असून याबाबत आम्ही माथेरान कार्यालयासमोर आंदोलन केले त्यावेळी सर्व समस्यांचे निराकरण एक महिन्यात करू असे सांगितले मात्र प्रत्यक्षात महावितरणने कोणतेच ठोस पाऊल उचलले नाही त्यातील एक समस्या वीज बिल वेळेवर मिळत नाहीत.यावर अधिकार्‍यांनी बिल वेळेवर दिले जातील असे सांगितले होते पण अजूनही परिस्थिती जैसे थे आहे. तर लाईट जाण्याच्या घटनेमुळे या वेळचा सिझनवर फरक पडला आहे. आता दिवाळी सिझनमध्ये लाईट न जाण्याचे नियोजन करा नाहीतर आता लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आंदोलन करावे लागेल.
संतोष कदम, मनसे शहराध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT