Matheran drainage work pudhari photo
रायगड

Matheran drainage work : माथेरानच्या नव्या गटारकामांची पावसामुळे पोलखोल

जांभा दगड उखडले; गॅबियन वॉल केवळ काही घरांपुरतीच? ५० लाखांच्या निविदेवरही नगरसेवकांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : आनंद सकपाळ

माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या हद्दीतील दिवाडकर हॉटेल ते संत रोहिदास नगरमार्गे पुढे कड्याकडे जाणाऱ्या नैसर्गिक पाण्याच्या निचऱ्याच्या नाल्याच्या कामावरून आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एप्रिलमध्ये पूर्ण झालेल्या या नाल्याच्या कामाची गुणवत्ता पहिल्याच उशिरा सुरू झालेल्या पावसात समोर आली असून, नाल्याच्या पृष्ठभागावर बसविण्यात आलेले जांभा दगड उखडून निघण्यास सुरुवात झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दिवाडकर हॉटेल ते संत रोहिदास नगरातून विमल काळे, भालचंद्र जाधव तसेच संजय कदम यांच्या घराशेजारून पुढे जाणाऱ्या या नाल्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येतो. त्यामुळे पाण्याची गती कमी करण्यासाठी नाल्याच्या पृष्ठभागावर ठराविक अंतराने पायऱ्यांसारखे स्टेप्स देणे अपेक्षित होते, असा स्थानिकांचा दावा आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही आवश्यक तांत्रिक बाबींचा पुरेसा विचार न करता नाल्याचा पृष्ठभाग जांभा दगड बसवून सपाट पद्धतीने करण्यात आल्याने पाण्याच्या वेगाचा परिणाम कामावर होत असल्याचे चित्र आहे.

नाल्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे लगतच्या घरांच्या भिंतींची धूप होऊ नये आणि घरांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी काही ठिकाणी अंदाजे ३० ते ४० मीटर लांबीची गॅबियन वॉल उभारण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, नाल्यालगत असलेल्या इतर घरांच्या सुरक्षेचा प्रश्न अद्याप कायम असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

काही घरांच्या सुरक्षेसाठी गॅबियन वॉल करण्यात आली, मग उर्वरित घरांचे काय? उर्वरित गॅबियन वॉलचे काम ठेकेदार करणार की नगरपरिषद? असा संतप्त सवाल स्थानिक रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

या कामासंदर्भातील नगरपरिषदेच्या ३ नोव्हेंबर रोजीच्या कार्यदिशेनुसार, संत रोहिदास नगराजवळील गटार बांधकामाचे काम सी.एन. लदानी इंटरप्राईजेस यांना देण्यात आले होते. निविदेतील ४.५ टक्के कमी दरानुसार या कामाची रक्कम रू २८ लाख ६५ हजार मंजूर करण्यात आल्याचे कार्यदिशेत नमूद आहे. तसेच कामाची मुदत १८० दिवस ठेवण्यात आली होती.

कार्यदिशेत काम निविदेतील अटी, शर्ती, स्पेसिफिकेशन व मापदंडांनुसार तसेच नगर अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता, वापरलेले साहित्य आणि पावसाच्या पाण्याचा निचरा लक्षात घेऊन करण्यात आलेल्या तांत्रिक उपाययोजनांची तपासणी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

नगरसेवक सचिन दाभेकर यांनी २९ ऑगस्ट रोजी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन दिवाडकर हॉटेल ते मधुमालती हॉटेल आणि पुढे विमल काळे यांच्या घरापर्यंत गटाराचे काम पूर्ण झाले असल्याचे नमूद केले आहे. मात्र, विमल काळे यांच्या घरापासून पुढे संजय कदम व रेनोसे यांच्या घरापर्यंत गटाराचे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता महत्त्वाची

नगरपरिषदेच्या कागदोपत्री कार्यदिशेत कामासाठी अटी, मापदंड आणि अभियंत्यांच्या मार्गदर्शनाचा स्पष्ट उल्लेख असला, तरी प्रत्यक्षात पावसाळ्यात नाल्याची स्थिती काय आहे, हेच आता महत्त्वाचे ठरणार आहे. पहिल्याच पावसात जांभा दगड निखळत असतील तर कामाच्या दर्जाची तपासणी झाली का, काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र कोणत्या निकषांवर देण्यात आले आणि संबंधित कामाची गुणवत्ता तपासणी कोणी केली, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

नैसर्गिक नाल्यात सांडपाणी का?

माथेरानमध्ये सध्या मलनिःसारण प्रकल्पाचे काम सुरू असताना काही घरांचे सांडपाणी या नैसर्गिक नाल्यात सोडले जात असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाचा निचरा करणाऱ्या नाल्याचे स्वरूपच बदलण्याची शक्यता असून, यामुळे भविष्यात पर्यावरणीय तसेच आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने या संपूर्ण नाल्याची तांत्रिक पाहणी, कामाची गुणवत्ता, वापरलेल्या जांभा दगडांची मजबुती, गॅबियन वॉलची आवश्यकता व लांबी, पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आणि नाल्यात सोडले जाणारे सांडपाणी यांची स्वतंत्र तपासणी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT