पाली भागातील जंगलाला भीषण आग? रानमेवा, कंदमुळे नष्ट pudhari photo
रायगड

Pali Forest Fire : पाली भागातील जंगलाला भीषण आग? रानमेवा, कंदमुळे नष्ट

आदिवासींचे उपजीविकेचे साधन नष्ट होण्याची भीती; टोरंट प्रकल्पासाठी आग लावल्याचा संशय

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : कर्जत तालुक्यातील पाली परिसरातील साई डोंगर भागात प्रस्तावित टोरंट पॉवर पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पावरून स्थानिक आदिवासी ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकल्पासाठी जंगलाला आग लावून आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे साधन नष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी टोरंट कंपनीवर केला आहे.

केंद्र सरकारकडून खासगी स्वरूपातील टोरंट पॉवर पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पासाठी वन विभागाची सुमारे 640 एकर जमीन कंपनीला देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या परिसरातील जंगल हे स्थानिक आदिवासी समाजाच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पालीतर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत हद्दीतील अनेक आदिवासी कुटुंबांचा उदरनिर्वाह जंगलातील रानमेवा, कंदमुळे, रानभाज्या तसेच करवंद, जांभूळ यांसारखी फळे गोळा करून त्यांची विक्री करण्यावर अवलंबून असतो. पावसाळ्यात रानभाज्या तर उन्हाळा आणि हिवाळ्यात जंगली फळे गोळा करून आसपासच्या गावांमध्ये विक्री केली जाते. याच उत्पन्नावर अनेक कुटुंबांचा संसार चालतो.

मात्र, जंगलाला लागलेल्या आगीमुळे करवंद, जांभूळ तसेच इतर वनउपज देणाऱ्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीची झळ आंब्याच्या झाडांनाही बसल्याने झाडावरील आंबे गळून पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

त्यामुळे आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ आल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. स्थानिक आदिवासींच्या म्हणण्यानुसार, साई डोंगर परिसरात यापूर्वी कधीही अशा प्रकारचे वणवे लागले नव्हते.

एखाद्या वेळी आग लागलीच तर ग्रामस्थ स्वतः पुढाकार घेऊन ती विझवत असत. कारण जंगलातील रानमेवा हाच त्यांच्या जीवनाचा आधार होता. मात्र, यावेळी जंगलातील अनेक ठिकाणी एकाच वेळी आगीचे लोळ उठल्याने ही आग मानवनिर्मित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

  • आदिवासी ग्रामस्थांचा आरोप आहे की, प्रकल्पासाठी जंगलातील जुनी आणि दाट झाडे कमी करण्याच्या उद्देशानेच आग लावण्यात आली. या आगीत अनेक मोठी झाडे कोलमडून पडली असून करवंदांच्या जाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी, स्थानिक आदिवासी समाजामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT