Marriage Promise Fraud Pudhari
रायगड

Marriage Promise Fraud: विवाहाचे आश्वासन देत दागिने, तीन लाखांची रक्कम घेतल्याचा तरूणीचा आरोप; गुन्हा दाखल

या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नेरळ: लग्नाचे आश्वासन देत प्रेमसंबंध प्रस्थापित करून एका तरुणीकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन नंतर विवाहास नकार देत आर्थिक फसवणूक केल्याची घटना कर्जत तालुक्यातील गुंडगे येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि गुंडगे येथील आरोपी यांच्यात काही काळापासून प्रेमसंबंध होते.

दोघांचा लवकरच विवाह होणार असल्याचे ठरले होते. या विश्वासाचा फायदा घेत आरोपीने व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे सांगत फिर्यादीकडून तिच्या आईचे सुमारे दोन तोळ्यांचे लक्ष्मीहार, राणीहार, कानातले, सोन्याची चैन तसेच टप्प्याटप्प्याने तीन लाख रुपये रोख घेतल्याचा आरोप आहे.

मात्र, दागिने व रोख रक्कम मिळाल्यानंतर आरोपीने विवाह करण्यास नकार दिला. तसेच, घेतलेले दागिने आणि पैसे परत करण्याची वारंवार मागणी करूनही त्याने टाळाटाळ केल्याचे फिर्यादीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

यानंतर पीडित तरुणीने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हा कर्जत पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे करीत आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT