माणगाव : कमलाकर होवाळ
माणगाव शहराच्या हद्दीत तीन वषार्ंपूर्वी मंजूर झालेले ट्रॉमा केअर सेंटर आजही फक्त कागदावर रंगवलेले स्वप्न ठरले आहे. या केंद्राच्या मंजुरीची बातमी आली तेव्हा संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे वातावरण होते. मात्र, तीन वर्षांच्या कालावधीनंतरही प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली नाही. त्यामुळे ट्रॉमा केअर सेंटर आता ड्रामा केअर सेंटर बनले आहे, अशी उपहासात्मक टीका नागरिक करू लागले आहेत.
या ट्रॉमा केअर सेंटरसाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयालगत 34 गुंठे जागा निश्चित झाली असून याठिकाणी असणार्या पूर्वीच्या पंचायत समिती इमारतीत तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालयाचे कामकाज सुरु आहे. या कार्यालयाला माणगाव उपजिल्हा रुग्णालयाने स्थलांतरीत करण्यासाठी पत्र व्यवहार केला. मात्र अद्यापही हे कार्यालय त्याच ठिकाणी चालू आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच या ट्रॉमा केअर सेंटर उभारणीकडे शासन, लोकप्रतिनिधींनी पाठच फिरवली आहे. त्यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुंबई - गोवा महामार्ग तसेच माणगावसारख्या शहरात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच झालेल्या महामार्गावरील विविध अपघातानंतर प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला असून महामार्गावरील माणगाव उपजिल्हा रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर नसल्याने अपघातग्रस्त रुग्णावर योग्य व तातडीचे उपचार मिळत नसल्याने अनेक निष्पाप रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. ज्या लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला, त्यांनी सुरुवातीला मोठ्या घोषणाबाजी केल्या. माणगावच्या ट्रॉमा केअर सेंटरची अवस्था ही प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाचा प्रत्यय देते.
माणगाव ट्रॉमा केअर सेंटर 10 खाटांचे लेवल 3 चे उभारले जाणार आहे. यात स्त्री - पुरुष स्वतंत्र कक्ष अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग, अपघात विभाग, डायलेसिस विभाग, शवविच्छेदन कक्ष, प्रयोगशाळा कक्ष, अधिकारी कर्मचार्यांसाठी निवासस्थान असे विविध सोयीसुविधा याठिकाणी असणार आहेत. या सेंटरचा वास्तुशास्त्रज्ञाकडून आराखडा शासनाकडे आला असून तो आता मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविला गेला आहे. या कामाला आर्थिक तरतूद मंजूर झाल्यानंतर पुढची प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र 24 फेबुवारी 2022 ला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंजुरीला चार वर्ष होत आहेत.
मुंबई-गोवा व दिघी-पुणे अशा महत्वाच्या राज्य मार्गावर अनेक वेळा विविध अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार करण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटरची नितांत गरज आहे. मात्र हे ट्रॉमा केअर सेंटर उभारणीला शासनाला मुहूर्त सापडत नसल्याने हे ट्रॉमा केअर सेंटर फक्त कागदावर उरले आहे. त्यामुळे रुग्ण व नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. माणगाव तालुक्यासह अन्य तालुक्यातून नागरिक उपचारासाठी मोठ्या संख्येने येतात. सामान्य नागरिकांना खाजगी - महागडी रुग्णसेवा परवडत नसल्याने दक्षिण रायगडसह नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अनेक रुग्ण माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत.
कोकणवासियांचा सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी पाच ते दहा लाख वाहने मुंबई-गोवा महामार्गाचा वापर करतात. त्यामुळे या महामार्गावर लहान-मोठे अपघात होत असतात. अशावेळी माणगावमधील महामार्गावरील ट्रामा केअर सेंटरची सुविधा महत्वाची ठरते. मोठा अपघात झाल्यास जखमींना तातडीने योग्य उपचार मिळण्यास या सेेंटरची मदत होणार आहे. मात्र ट्रॉमा केअर सेंटर गेले तीन वर्षापासून कागदवरच राहिले आहे. हे सेंटर उभारणीसाठी शासन एक पाऊल पुढे कधी टाकणार असा सवाल नागरीकातून उपस्थित होत आहे, कोकणवासियांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.