गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे विघ्न 
रायगड

Raigad News : कोंडीचा ‘हॉटस्पॉट’ माणगावच

गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे विघ्न

पुढारी वृत्तसेवा

कमलाकर होवाळ

माणगाव : आपल्या लाडक्या दैवताचे मनोभावे सेवा करून त्या गणरायाला निरोप देऊन आपल्या कर्मभूमीकडे निघालेल्या गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासाला मुंबई–गोवा महामार्गावरील माणगाव बाजारपेठेत पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचे विघ्न उभारले आहे. माणगाव बाजारपेठ, इंदापूर परिसरातील अरुंद मार्ग आणि रखडलेले माणगाव–इंदापूर बायपासचे काम यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, प्रवाशांना तासन्तास अडकून पडावे लागत आहे. गणेशोत्सवापूर्वी बायपासची किमान एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्याची लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांची आश्वासने प्रत्यक्षात उतरली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महामार्गा वरील वाहतूक कोंडीचा ‘हॉटस्पॉट’ माणगावच बनला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे आणि परिसरातून कोकणात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून नियोजन व बंदोबस्त करण्यात आला असला, तरी महामार्गाची मर्यादित क्षमता आणि वाढता वाहनभार यामुळे कोंडीची समस्या कायम आहे. माणगाव बाजारपेठ व इंदापूर परिसरातील वाहतूक मंदावल्याने त्याचा परिणाम अंतर्गत रस्त्यांवरही होत आहे. गणेशोत्सवापूर्वी बायपासची एक लेन सुरू करण्यासाठी पाहणी, बैठका आणि कामाचा आढावा घेण्यात आला होता. ठेकेदाराकडून कामाच्या प्रगतीबाबत माहिती घेऊन आश्वासने देण्यात आली; मात्र प्रत्यक्ष कामाची गती, यंत्रसामग्री आणि बांधकामाची अवस्था पाहता मुदतीत मार्ग खुला होण्याबाबत स्थानिक स्तरावरून यापूर्वीच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सध्याची वाहतूक कोंडी या चिंतेला पुष्टी देणारी ठरत आहे.

दरवर्षी गणेशोत्सवात वाढणाऱ्या वाहतुकीची पूर्वकल्पना असतानाही पर्यायी मार्ग, प्रभावी डायव्हर्शन आणि शहरातील वाहतूक व्यवस्थापन याबाबत दीर्घकालीन नियोजन का झाले नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT