Raigad electricity problem pudhari photo
रायगड

Raigad electricity problem : गणेशोत्सवाच्या तोंडावर माणगावात विजेचा खेळखंडोबा

तासन्‌तास वीजपुरवठा खंडित; विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन कामांवर परिणाम; महावितरणच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

माणगाव : कमलाकर होवाळ

गणेशोत्सवासह सणासुदीचे दिवस सुरू असतानाच माणगाव तालुक्यातील वीजव्यवस्थेची अकार्यक्षमता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून वीजपुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत असताना सणासुदीच्या काळातही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत विजेच्या अनिश्चित पुरवठ्यामुळे नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि विविध व्यावसायिक अक्षरशः हैराण झाले असून, महावितरणच्या नियोजन आणि देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

पावसाळा सुरू झाल्या पासून सतत विजेचा लपंडाव सुरू असून अनेक वेळा तासंतास तर कांही वेळा दिवस दिवस विज पुरवठा खंडित होतो. वीज पुरवठ्याच्या या अनिश्चिततेचा सर्वाधिक फटका सध्या विद्यार्थ्यांना बसत आहे. हा हंगाम विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक कागदपत्रे, विविध दाखले तसेच ऑनलाइन अर्जांसाठी सायबर कॅफे आणि इतर डिजिटल सुविधांवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांना वीजपुरवठा खंडित झाल्याने तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

प्रवेश प्रक्रियेची महत्त्वाची मुदत जवळ आलेली असताना वीजसेवेतील वारंवार व्यत्ययामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाया जात असून, मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही समस्या अधिक गंभीर ठरत आहे. तालुक्यातील अनेक गावांचा पाणीपुरवठा वीजेवर अवलंबून असल्याने वीज पुरवठ्यातील बिघाडाचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे.

पाणी उपसा यंत्रणा वीजेअभावी बंद पडल्याने काही ठिकाणी पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत होत आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमते बाबतही नाराजी व्यक्त होत आहे.

बाजारपेठेत सणासुदीमुळे ग्राहकांची गर्दी वाढलेली असताना व्यापारी आणि व्यावसायिकांनाही वीजेच्या अनिश्चिततेचा मोठा फटका बसत आहे. पीठ गिरण्या, हॉटेल्स, खाद्यपदार्थ तयार करणारे व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, शीतपेय विक्रेते तसेच विजेवर चालणाऱ्या विविध उपकरणांवर अवलंबून असलेल्या व्यवसायांचे कामकाज वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रभावित होत आहे. ग्राहकांची गर्दी असतानाच वीज गेल्याने व्यवहार ठप्प होणे, सेवा देण्यात अडथळे येणे आणि ग्राहकांचा खोळंबा होणे, असे प्रकार वारंवार घडत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

दुग्ध व्यवसाय आणि शीतपेय विक्रीसारख्या व्यवसायांमध्ये शीतकरणाची यंत्रणा सातत्याने सुरू राहणे अत्यावश्यक असते. मात्र वारंवार होणाऱ्या वीज व्यत्ययामुळे मालाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होत आहे. हॉटेल व्यावसायिकांपासून छोट्या दुकानदारांपर्यंत अनेकांच्या दैनंदिन उलाढालीवर याचा परिणाम होत असून, सणासुदीच्या काळातील संभाव्य व्यावसायिक नुकसान मोठे असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

पावसाळ्यात वीजपुरवठ्यात अडथळे निर्माण होणे नवीन बाब नाही. मात्र पावसाळ्यापूर्वी आवश्यक देखभाल - दुरुस्ती, वीज वाहिन्यांची तपासणी, रोहित्रांची क्षमता पडताळणी आणि संभाव्य बिघाडांवर तातडीने उपाय करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणे ही संबंधित वीजयंत्रणेची मूलभूत जबाबदारी आहे. समस्या निर्माण झाल्यानंतर केवळ तात्पुरती दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करणे आणि पुन्हा त्याच ठिकाणी बिघाड होणे, या चक्राला कायमस्वरूपी आळा कधी बसणार, असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.

महावितरणकडून ग्राहका कडून वीज बिलांची वसुली मात्र नियमितपणे केली जाते. बिल भरण्यात कसूर केल्यास त्यांच्यावर कारवाईची तत्परता दाखविली जाते; मग ग्राहकांना अपेक्षित असलेली अखंड सेवा देताना त्याच पातळीची जबाबदारी का दिसत नाही, असा प्रश्न माणगावकरांकडून उपस्थित केला जात आहे.

वारंवार बिघाड होणाऱ्या भागांची जबाबदारी कोणाची?

केवळ बिघाड झाल्यानंतर तात्पुरती दुरुस्ती करण्यापेक्षा वीज यंत्रणेची सखोल तपासणी करून संवेदनशील भाग निश्चित करणे, जुन्या आणि धोकादायक यंत्रणेचे नूतनीकरण करणे, आवश्यकतेनुसार वाहिन्या व रोहित्रांची क्षमता वाढविणे आणि वारंवार बिघाड होणाऱ्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करणे, ही काळाची गरज आहे.

माणगाव तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिक आता केवळ आश्वासनांवर समाधान मानण्याच्या मनःस्थितीत नाहीत. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी नेमकी कोणती उपाययोजना करण्यात येणार, वारंवार बिघाड होणाऱ्या भागांची जबाबदारी कोणाची, देखभाल-दुरुस्तीचे नियोजन काय आणि या समस्येवर दीर्घकालीन तोडगा कधी निघणार, याचा स्पष्ट आराखडा महावितरणने जनतेसमोर मांडण्याची वेळ आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT