Mangaon Kal River Water Level Pudhari
रायगड

Mangaon Kal River Water Level: माणगावमध्ये ऑक्टोबरमध्येच काळ नदीची पाणीपातळी घटली; उन्हाळ्यात पाणीटंचाईची चिंता

ऑक्टोबरमध्येच पाणीपातळी खालावली; आगामी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचे सावट

पुढारी वृत्तसेवा

अरुण पवार

माणगाव: ज्या काळ नदीच्या पाण्यावर माणगावकरांची तहान भागते, त्याच जीवनदायिनी नदीची पाणीपातळी ऑक्टोबर महिन्यातच खालावत असल्याचे चित्र समोर येत आहे. उन्हाची तीव्रता, बाष्पीभवन आणि वाढती पाण्याची मागणी यामुळे नदीतील पाणीसाठ्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

पावसाळा संपताच नदीची अशी अवस्था होत असेल, तर आगामी उन्हाळ्यात माणगावकरांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागण्याची भीती आहे. त्यामुळे आजच पाण्याचे नियोजन केले नाही, तर उद्या पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी धावपळ करण्याची वेळ येऊ शकते.

माणगाव शहराला काळ नदीतून दररोज सुमारे ५० लाख लिटर पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती आहे. शहराची लोकसंख्या तीस हजारांहून अधिक असून, वाढती वस्ती, नागरीकरण आणि दैनंदिन गरजांमुळे पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे.

अशा परिस्थितीत नदीतील पाणीसाठा कमी होणे ही केवळ नैसर्गिक घडामोड नसून शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्यासमोरील मोठे आव्हान ठरू शकते.

मुंबई–गोवा महामार्गाच्या माणगाव–इंदापूर बायपासच्या कामासाठीही मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत असल्याचे सांगितले जाते. या कामासाठी काळ नदीतील पाण्याचा किती उपसा केला जात आहे, याची तपासणी करून पिण्याच्या पाण्याच्या गरजेला प्राधान्य देण्याची मागणी होत आहे.

काळ नदीवर छोटे-मोठे बंधारे उभारून पावसाचे पाणी अडवावे आणि उन्हाळ्यासाठी जलसाठा निर्माण करावा, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती. यासाठी लोकप्रतिनिधींकडेही पाठपुरावा करण्यात आल्याचे सांगितले जाते.

सर्वेक्षण झाल्याची माहिती असली, तरी बंधाऱ्यांसाठी निधी उपलब्ध झालेला नसल्याने प्रत्यक्ष कामाबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा योग्य वापर करता आला, तर उन्हाळ्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे बंधाऱ्यांच्या प्रस्तावांना गती देणे, उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन करणे आणि भूजल पुनर्भरणासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागावरही पाणीटंचाईचे सावट माणगाव तालुक्यातील अनेक गावांमध्येही पिण्याच्या पाण्यासाठी काळ नदीवर अवलंबून राहावे लागते. नदीतून विविध ठिकाणी पाणी उपसा होत असल्याने पाणीपातळी कमी होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच काळ प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी यंदा सोडले जाणार नसल्याची चर्चा असल्याने जलसाठ्याच्या नियोजनाबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. या संदर्भातील अधिकृत स्थिती स्पष्ट होणेही महत्त्वाचे आहे.

प्रशासनाने आताच जागे व्हावे!

पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर टँकर, पाणीवाटप आणि तात्पुरत्या उपाययोजनांची धावपळ करण्यापेक्षा आधीच नियोजन करणे आवश्यक आहे. माणगाव नगरपंचायत, तहसीलदार आणि प्रांताधिकारी कार्यालयाने नदीतील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे. बंधाऱ्यांच्या कामासाठी निधी, पाणी उपशावर नियंत्रण आणि पर्यायी जलस्रोत याबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल

पाणी म्हणजे केवळ नळातून येणारा प्रवाह नाही; तो प्रत्येक कुटुंबाच्या जगण्याचा आधार आहे. घरातील पाण्याचा अपव्यय टाळणे, गळती त्वरित दुरुस्त करणे, गरजेपुरतेच पाणी वापरणे आणि पावसाचे पाणी साठविण्याचे प्रयत्न करणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

काळ नदी आटली, तर माणगावच्या दैनंदिन जीवनावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे संकट दारात येण्याची वाट न पाहता प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन जलसंधारणाला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे. आज पाणी वाचवले, तरच उद्याची तहान भागवता येईल!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT