Sunil Tatkare Pudhari
रायगड

Mumbai Goa Highway Bypass: माणगाव-इंदापूर बायपासची मुदत पुन्हा हुकली! खा. सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून बायपासला गती

रेल्वेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ओव्हरब्रिजचे काम रखडले

पुढारी वृत्तसेवा

कमलाकर होवाळ

माणगाव: मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या माणगाव आणि इंदापूर बायपास प्रकल्पाबाबत नागरिकांच्या अपेक्षांवर पुन्हा एकदा पाणी फेरले गेले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि खा. सुनील तटकरे यांनी 1 जून 2026 पर्यंत हे दोन्ही बायपास पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुले होतील, असे आश्वासन दिले होते. आता ही मुदत संपुष्टात आली असून अद्याप प्रकल्प पूर्णत्वास पोहोचलेला नाही.

खा.सुनील तटकरे यांच्या माध्यमातून या बायपास महामार्गाला प्रचंड गती मिळाली आहे असे अधिकार्यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे वाहतूक कोंडी, अपघात आणि प्रवाशांचा होणारा वेळेचा अपव्यय यामुळे माणगाव व इंदापूर परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.

त्यामुळे या बायपासकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले होते. परंतु प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात कोकण रेल्वेवरील ओव्हर ब्रिजच्या कामात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे संपूर्ण काम रखडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

17 वर्षांची प्रतीक्षा अजूनही कायम -मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा प्रकल्प गेली सुमारे 17 वर्षे विविध कारणांनी रखडलेला आहे. भूमी संपादन, निधी, तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय प्रक्रियांमुळे या महामार्गाचे काम वारंवार लांबले. त्यामुळे कोकणातील जनतेमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

माणगाव आणि इंदापूर बायपास हे या महामार्गावरील महत्त्वाचे टप्पे मानले जातात. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यास महामार्गाच्या उर्वरित कामांनाही गती मिळेल आणि मुंबई ते गोवा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुखकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष काम पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. अनेक मुदती उलटल्यानंतरही बायपास पूर्ण न झाल्याने जनतेचा संयम संपत चालला आहे. रेल्वे प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

वाहतूक कोंडीपासून मिळणार मोठा दिलासा- माणगाव आणि इंदापूर ही दोन्ही ठिकाणे मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत वर्दळीची केंद्रे आहेत. शहरातून जाणाऱ्या जड वाहनांमुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.

सणासुदीच्या काळात आणि पर्यटन हंगामात परिस्थिती अधिक गंभीर बनते. बायपास सुरू झाल्यानंतर शहरातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून स्थानिक नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रस्ते आणि पूल तयार; ओव्हर ब्रिजमुळे अडथळा

प्रकल्पाच्या बहुतांश कामांना आता अंतिम स्वरूप आले आहे. बायपासवरील रस्ते, काळ नदीवरील पूल तसेच इतर महत्त्वाची नागरी कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणी एका मार्गिकेवरून वाहतूक सुरूही करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वाहनचालक या मार्गाचा वापर करू लागले असून प्रत्यक्षात बायपासची उपयुक्तता नागरिकांना जाणवू लागली आहे.

मात्र कोकण रेल्वे मार्गावर उभारण्यात येणाऱ्या ओव्हरब्रिजच्या कामासाठी आवश्यक मंजुरी आणि मेगा ब्लॉक मिळण्यात झालेल्या विलंबामुळे संपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे. स्थानिक पातळीवर आणि केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासनाची भूमिका अपेक्षेप्रमाणे सकारात्मक नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

6 जूनला रेल्वे अधिकाऱ्यांची पाहणी

6 जून रोजी कोकण रेल्वेचे वरिष्ठ महाव्यवस्थापक गुप्ता हे अभियंते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह माणगाव व इंदापूर बायपास परिसराची पाहणी करणार आहेत. या पाहणीनंतर आवश्यक मेगा ब्लॉक निश्चित करण्यात येणार असून त्यानंतर ओव्हर ब्रिजच्या कामाला प्रत्यक्ष वेग मिळण्याची शक्यता आहे. प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार, पाहणी आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक ते दोन महिन्यांत दोन्ही बायपास वाहतुकीसाठी खुले होऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT