माणगाव : कमलाकर होवाळ
गणेशोत्सवाला अवघे कांही दिवस शिल्लक असताना मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव–इंदापूर बायपासचा रखडलेला प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवा पूर्वी बायपासची किमान एकेरी मार्गिका वाहतुकी साठी खुली करण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधी आणि प्रशासना कडून वारंवार दिले जात असले, तरी प्रत्यक्ष बांधकामाची सद्यस्थिती पाहता १५ सप्टेंबरपर्यंत एकेरी वाहतूक सुरू होणेही अशक्यप्राय असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाही कोकणच्या दिशेने जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना माणगाव शहरातील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाचे वर्षीही महामार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न अटळ आहे.
गेल्या काही काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंह भोसले, खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री ना. अदिती तटकरे तसेच पालकमंत्री भरत गोगावले यांनी महामार्ग व माणगाव बायपासच्या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदारा कडून कामाचा आढावा घेतला. गणेशोत्सवा पूर्वी किमान एक मार्गिका सुरू करण्याच्या सूचना आणि आश्वासने देण्यात आली.
खा. सुनील तटकरे यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन माणगाव व इंदापूर बायपासच्या अपूर्ण कामाकडे लक्ष वेधले. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात तरी कोकण वासीयांचा प्रवास सुकर होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र पाहणी दौरे, बैठका आणि आश्वासनांची रेलचेल सुरू असताना प्रत्यक्ष कामाची गती मात्र नागरिकांच्या अपेक्षे प्रमाणे वाढलेली दिसत नाही.
बायपास मार्गावरील अनेक महत्त्वाची पुलांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. माणगाव, इंदापूर बायपास वरील कांही ठिकाणी प्राथमिक स्वरूपाचे बांधकाम झाले असले तरी पुलांचे गर्डर, डेक स्लॅब, जोड रस्ते, मातीचा भराव आणि अंतिम रस्ते बांधणीची कामे बाकी असल्याचे दिसून येते. विशेषतः कोकण रेल्वे मार्गा वरील उड्डाणपूल आणि कळमजे फाटा येथील गोधनदी वरील पुलाच्या कामाची गती हा गंभीर प्रश्न ठरत आहे.
पुलांचे काम पूर्ण झाल्या नंतरही मोठ्या प्रमाणावर मातीचा भराव, त्याचे योग्य संपीडन, रस्त्याची पातळी निश्चित करणे, डांबरी करण आणि वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक सुरक्षा व्यवस्था करावी लागणार आहे. त्यातच सध्या मुसळधार पावसाचा हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर भराव व रस्ते बांधणीची कामे वेगाने पूर्ण करण्यास तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत.
गेल्या १७ वर्षापासून रखडलेल्या माणगाव–इंदापूर बायपास बाबत नागरिकांना केवळ तारखा वर तारखा मिळत असल्याची भावना आता तीव्र झाली आहे. प्रत्येक वेळी नवीन मुदत, नवीन आश्वासन आणि नवीन पाहणी दौरा होतो. मात्र प्रत्यक्षात बायपास वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुला होण्याची तारीख पुढेच ढकलली जाते. त्यामुळे नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. लोकप्रतिनिधींनी कामाचा आढावा घेणे ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे, मात्र पाहणी करून आश्वासन देण्यापेक्षा ठेकेदाराकडून प्रत्यक्ष काम करून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
ठेकेदाराला कामाची मुदत २०२७ पर्यंत असल्याने गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण करण्याच्या घोषणा कितपत वास्तववादी आहेत, असा सवाल आता उपस्थित होत आहे. कामाच्या प्रत्यक्ष प्रगतीबाबत संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना पूर्ण वस्तुस्थिती सांगितली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिका कडून होत आहे. पाहणीच्या वेळी निवडक ठिकाणचे काम दाखवून उर्वरित अपूर्ण कामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे. जर कामाची खरी प्रगती समाधानकारक असेल, तर संपूर्ण प्रकल्पाची सद्यस्थिती सार्वजनिक करण्यास अडचण काय? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
लोकप्रतिनिधींनीही केवळ ठेकेदाराच्या आश्वासनांवर विसंबून न राहता कामाच्या प्रत्येक टप्प्याचे वस्तुनिष्ठ परीक्षण करणे गरजेचे आहे. कारण या प्रकल्पाची जबाबदारी केवळ ठेकेदाराची नसून नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची राजकीय जबाबदारी लोकप्रतिनिधींचीही आहे. गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा प्रवासी हंगाम आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सुरत आणि राज्यातील विविध भागांतून लाखो चाकरमानी गणेशोत्सवा साठी कोकणात दाखल होतात. या काळात माणगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर प्रचंड वाहतूक वाढते. बायपास उपलब्ध नसल्याने अवजड वाहने, खासगी वाहने आणि गणेशभक्तांच्या वाहनांचा भार शहरातील मुख्य मार्गावर येतो आणि वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते.
लोकप्रतिनिधींनी कामाची पाहणी करावी
लोकप्रतिनिधींनी आता ठेकेदाराच्या शब्दांवर विश्वास ठेवण्याऐवजी कामाची दिवसागणिक प्रगती तपासावी, अपूर्ण कामांची स्पष्ट यादी जाहीर करावी आणि गणेशोत्सवाच्या वाहतुकीसाठी ठोस पर्यायी नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. एकूणच, पाहण्या झाल्या, बैठका झाल्या, आश्वासने झाली. पण रस्ता मात्र अजूनही अपूर्णच! गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असताना बायपासची प्रत्यक्ष स्थिती पाहता यंदाही कोकणवासीयांच्या वाट्याला वाहतूक कोंडीच येणार का, हा प्रश्न गंभीर बनला आहे.