माणगाव: माणगाव तालुक्यातील बोले गाव परिसरात गुरेचोरीच्या सलग घटनांनी शेतकऱ्यांच्या चिंतेला आता संतापाची किनार आली आहे. गेल्या काही दिवसांत चार गुरे चोरीला गेल्याची माहिती समोर आली असून, काही गुरांची कत्तल करून मांस नेण्यात आल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या घटनांमुळे रात्रीच्या वेळी गोठ्यांमध्ये बांधलेल्या जनावरांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
२३ सप्टेंबर २०२६ रोजी बोले गावातील नंदन हॉटेलजवळून पुन्हा चार गुरे चोरीला गेल्याची तक्रार समोर आली. यामध्ये संदीप पवार यांच्या सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या बैलाचा, हेमंत मोहिते यांच्या सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या बैलाचा, शीताराम शिंदे यांच्या सुमारे ३५ हजार रुपये किमतीच्या गायीचा तसेच मारुती मोहिते यांच्या सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या गाभण गायीचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे गाभण गायीची कत्तल करून तिचे मांस नेण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, पोतीत मांस भरून फेकून दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या घटनेने परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांसाठी गुरे म्हणजे केवळ जनावरे नसून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार आणि वर्षानुवर्षे जपलेली संपत्ती असते.
त्यामुळे गोठ्यातून गुरे चोरीला जाणे आणि त्यानंतर त्यांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याचा संशय निर्माण होणे, ही बाब शेतकऱ्यांसाठी अत्यंत वेदनादायी ठरत आहे.
१० सप्टेंबर २०२६ रोजी बोले येथील बौद्धवाडीतील शेतकरी संदीप पवार यांचा बैल चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा चार गुरे चोरीला गेल्याने या घटनांमागे एकाच टोळीचा सहभाग आहे का, याचा तपास करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून, पुढील तपास पोलीस सागर जाधव करीत आहेत. पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचे सांगितले असून, लवकरच आरोपींना अटक करू, असा विश्वास व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांचे आवाहन : गोठ्यांवर आणि सुरक्षेवर विशेष लक्ष द्या
गुरेचोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
गुरेचोरी थांबवून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार कधी? हा प्रश्न आता बोले गावासह परिसरातील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. चोरीच्या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.