कमलाकर होवाळ
माणगाव: यंदा पावसाने पाठ फिरवल्याने माणगाव तालुक्यातील शेतीचे गणितच कोलमडले आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत अपेक्षित असलेला पाऊस न झाल्याने पावसाची नक्षत्रे कोरडी गेली असून, नदी, नाले, ओढे आणि जलस्रोतांमधील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे.
त्याचा थेट परिणाम आता रब्बी हंगामातील पिकांवर दिसू लागला आहे. पाणीटंचाईच्या भीतीने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला, कडधान्य आणि कलिंगड लागवडीकडे पाठ फिरवली आहे.
तर लागवड केलेल्या शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी पाणी मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही गावांमध्ये नदी-नाल्यांतून पाणी उचलण्यास ग्रामस्थांकडून विरोध होत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात दुष्काळाचे सावट गडद होत असताना आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची चिन्हे आहेत. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन शासन आणि प्रशासनाकडून जलस्रोतांच्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दुसरीकडे, गावोगावी ग्रामस्थ श्रमदानातून बंधारे उभारून उपलब्ध पाणी अडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून काही गावांनी शेतीसाठी नदी, नाले आणि ओढ्यांमधील पाणी उचलण्यावर निर्बंध घातल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. माणगाव तालुक्यात खरीप हंगामातील भातशेतीची कापणी झाल्यानंतर शेतकरी जमिनीतील ओलाव्याच्या आधारावर कडधान्यांची पेरणी करतात.
या पिकांना तुलनेने कमी पाण्याची गरज असल्याने शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील या पिकांकडे कल असतो. यंदाही वाल, मूग, हरभरा, पावटा, मटकी, चवळी, भुईमूग, तूर, उडीद, तीळ यांसह विविध कडधान्यांची लागवड सुरू आहे. मात्र, दरवर्षी साधारण ५०० हेक्टर क्षेत्रावर होणारी कडधान्य लागवड यंदा केवळ २२५ हेक्टरवर आली आहे. म्हणजेच लागवडीच्या क्षेत्रात निम्म्याहून अधिक घट झाली आहे. काही ठिकाणी अद्याप पेरणी सुरू असली तरी पाण्याची अनिश्चितता शेतकऱ्यांना सतावत आहे.
भाजीपाला उत्पादनालाही यंदा मोठा फटका बसला आहे. माणगाव तालुक्यात दरवर्षी सुमारे ४५० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड केली जाते. मात्र, यंदा हे क्षेत्र अवघ्या ७० हेक्टरपर्यंत मर्यादित राहिले आहे. कलिंगड लागवडीची स्थितीही चिंताजनक आहे. दरवर्षी साधारण १२०० ते १५०० एकर क्षेत्रावर होणारी कलिंगड लागवड यंदा केवळ ६०० एकरवर झाली आहे. पाण्याची उपलब्धता अनिश्चित असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक जोखीम टाळत लागवड न करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, स्थानिक बाजारपेठेतील भाजीपाला आणि कलिंगडाचा पुरवठाही प्रभावित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, खरीप भातशेतीनंतर रब्बी हंगामातील भात पिकासाठीही शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
साधारण डिसेंबर महिन्यात डोलवहळ बंधाऱ्याच्या कालव्याला पाणी सोडले जाते. या पाण्यावर अवलंबून असलेल्या काही क्षेत्रातील भातशेतीचे नियोजन सध्या पाण्याच्या अनिश्चितते मुळे रखडले आहे. कालव्याचे पाणी वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले नाही, तर या पिकालाही फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे पिण्याच्या पाण्याची चिंता, दुसरीकडे शेतीसाठी पाण्याची टंचाई आणि त्यातच गावपातळीवरील पाणी वापराचे निर्बंध, अशा तिहेरी कोंडीत माणगाव तालुक्यातील शेतकरी सापडला आहे. भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तालुक्यात यंदा रब्बी हंगामावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. शेतीचे घटते क्षेत्र, उत्पादनातील संभाव्य घसरण आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासन व कृषी विभागाने परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घेऊन पाणी वाटपाचे नियोजन, जल स्रोतांचे संवर्धन आणि शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा, यंदाच्या दुष्काळाची झळ केवळ शेता पुरती मर्यादित न राहता स्थानिक बाजारपेठ आणि सर्वसामान्यांच्या ताटा पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.