महाड / पेण शहर ः महाड औद्योगिक वसाहतीच्या अतिरिक्त क्षेत्रामध्ये असलेल्या प्रसोल कंपनीमध्ये आगीने रुद्ररुप धारण केले तर दुसर्या घटनेत पेण शहरातील चिंचपाडा पामबीच रोडवरील गटाराचे खोदकाम सुरू असताना महानगरच्या गॅस पाईपलाईनला जेसीबीचा फावडा लागल्याने तेथील पाईपलाईन फुटून मोठा आगडोंब उसळला. दोन्ही घटनेत वेळीच खबरदारी घेतल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
महाड औद्योगिक वसाहतीच्या अतिरिक्त क्षेत्रामध्ये असलेल्या प्रसोल कंपनीमध्ये सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. उत्पादन प्रक्रिये दरम्यान पिवळा फॉस्फरस आणि इतर ज्वलनशील कच्चामाल हाताळला जात असताना त्यांचा हवेशी संपर्क आल्याने ही आग भडकल्याची प्राथमिक माहिती कंपनी व्यवस्थापनाकडून दिली आहे. ही आग सुमारे अर्ध्या ते पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर पूर्णपणे नियंत्रणात आली. आगीने कुणी दुखापतग्रस्त झाले नसले तरीही आर्थिक हानी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
आगीचे निश्चित कारण कळू शकले नाही. यासंदर्भात महाड औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसी फायर फायटर, महाड नगर परिषद यांच्या वतीने तातडीने करण्यात आलेल्या उपाययोजनेमुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले, अशी माहिती महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी जीवन माने यांनी दिली आहे.
आगीच्या निश्चित कारणाबाबत कंपनी व्यवस्थापनाकडून माहिती मागविण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. तर दुसर्या घटनेत पेण शहरातील सुरू असणार्या काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांमुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबत असून शहरात पाण्याचा निचरा होत नसल्याने चिंचपाडा पामबीच रोडवरील आरसीका इलेक्ट्रॉनिक्स दुकानाजवळ पाण्याचा निचरा करण्यासाठी गटाराचे खोदकाम सुरू असताना महानगरच्या गॅस पाईपलाईनला जेसीबीचा फावडा लागल्याने तेथील पाईपलाईन फुटून मोठा आगडोंब उसळला. मात्र लागलीच या ठिकाणी अग्निशामक दलाची गाडी येऊन आग आटोक्यात आणून गॅस पाईपलाईन बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.
अशी घटना पुन्हा होऊ नये याकरिता सुट्टीच्या दिवशी कॉन्ट्रॅक्टदाराने कामे करू नये. तसेच येत्या मंगळवारी महानगर गॅसचे अधिकारी यांची बैठक बोलावली असून त्यामध्ये शहरातील फिरविण्यात आलेल्या गॅस लाईनबाबत माहिती घेत भविष्यात जर काही अशी घटना घडली तर त्यावर तात्काळ काय उपाययोजना करण्यात येईल, याची चर्चा होणार असल्याचे पेण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले.